मामाचे हरवलेले पत्र विद्यार्थ्यांना सापडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 04:54 PM2018-10-09T16:54:47+5:302018-10-09T16:56:12+5:30
सिन्नर येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित अभिनव बाल विकास मंदिरातील विद्यार्थ्यांनी जागतिक टपाल दिनानिमित्त मामा व आई-वडिलांना पत्र लेखनाचा उपक्रम राबविला.
काही वर्षांपासून मोबाईलच्या युगात व्हॉट्सअॅप, फेसबुक तसेच इतर माध्यमांमुळे पत्रलेखन दिवसेंदिवस लुप्त पावत चालले आहे. आपण पत्र लिहिण्याचे विसरलो. पण पूर्वीच्या काळी पत्र लिहीण्याची लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गरज होती. पण तंत्रज्ञानाच्या युगात पत्रव्यवहार कमी होत चाललेला असून हे पत्र लेखन नवीन पिढीला समजावे या हेतूने मुख्याध्यापक संगीता आव्हाड व विकास गीते यांच्या संकल्पनेतून पत्र लेखन हा उपक्रम शालेय आवारात राबविण्यात आला. चिमुकल्यांना पोस्टकार्ड कशी असतात, ते कसे लिहितात यासाठी एका हॉलमध्ये पोस्टकार्ड वाटप करण्यात आले. तसेच त्यांना आपापल्या मामाला तसेच आई-वडिलांना पत्र लिहीण्यास सांगण्यात आले. पत्रलेखन करताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पत्रलेखन करताना गावाकडच्या आठवणीत मुले हरवून गेली होती. याप्रसंगी स्काऊट गाईडचे अधिकारी हेमांगी पाटील, विश्वनाथ शिरोळे, संजीव गांगुर्डे, सुजोत कुमावत, संतोष जगताप, सरला वर्पे, रवींद्र बुचकुल, सविता दवंगे, संगीता गाडे, वैभव केदार, मीनाक्षी ठाकरे आदी उपस्थित होते.