धक्कादायक! काॅपी करू दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावरच दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 08:57 PM2023-03-20T20:57:41+5:302023-03-20T20:58:16+5:30
घडलेल्या घटनेत शिक्षकाच्या डोक्याला लागला जबर मार
अशोक बिदरी, मनमाड (जि. नाशिक) : यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेत ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविले जात असताना, मनमाड शहरातील एका विद्यालयात कॉपी करू न दिल्यामुळे दहावीचा पेपर सुटल्यानंतर विद्यार्थांच्या गर्दीत शिक्षकावर दगडफेक केल्याची घटना सोमवारी (दि.२०) घडली. याप्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षक नीलेश दिनकर जाधव (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे. नीलेश जाधव हे छत्रे विद्यालयातील कला शिक्षक असून, शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जातात. सध्या इयत्ता दहावीचे पेपर सुरू असल्याने नीलेश जाधव यांना येथील एच.ए.के हायस्कूलमध्ये बोर्डाच्या परीक्षेत सुपरव्हिजनचे काम सोपविण्यात आले होते. पेपर सुटल्यानंतर सुपरपव्हिजन संपवून नीलेश जाधव हे बाहेर पडत असताना, विद्यार्थ्यांमधून काही मुलांनी जाधव यांच्या दिशेने दगडफेक केली.
अचानक झालेल्या हल्ल्यात जाधव गोंधळून गेले. मात्र दगडाचा मारा लागल्यामुळे ते जखमी झाले आहे. त्यांच्या डोक्याला व डोळ्याला मार लागल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. याच अवस्थेत त्यांनी पोलिस ठाणे गाठले. जाधव यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तरी हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला, ते मात्र अद्याप कळू शकले नाही. सध्या दहावीच्या बोर्डाचे पेपर सुरू असल्याने शाळेच्या गेटजवळ एका शिक्षकावर असा हल्ला होणे संशय निर्माण करणारे आहे.