पिंप्री सदो आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा उपायुक्तांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 06:33 PM2019-01-04T18:33:26+5:302019-01-04T18:33:45+5:30
सुविधांचा अभाव : सहा कि.मी. पायपीट करून घेतली भेट
घोटी : आदिवासी विभागाच्या पिंप्री सदो ता. इगतपुरी येथील निवासी आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात असलेली आणि इतर मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी सहा कि.मी. पायपीट करत आदिवासी विकास विभागाचे उपआयुक्त लाभेश सलामे यांना घेराव घालून आपली कैफीयत मांडली.
इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथे सुसज्ज अशी निवासी नवीन आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेत दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतात. मात्र काही महिन्यांपासून या मुलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात आहे. तसेच इयत्ता दहावीची परीक्षा जवळ आलेली असतांना देखील काही विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध नाहीत. यासह शासनाच्या विविध सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले होते. विद्यार्थ्यांनी शाळेचे अधीक्षक आणि प्राचार्यांकडे अनेकदा तक्र ारी केल्या. मात्र त्यांनी दखल न घेता उलट दाखला देऊन घरी पाठविण्याचा दम देण्यात आला होता. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यात आदिवासी विभागाच्या आयुक्तांची भेट घेऊन कैफियत मांडण्यासाठी सहा किलोमीटर अंतर पायपीट करून महामार्ग गाठला होता. त्यावेळी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी मध्यस्थी करीत विद्यार्थ्यांची समजूत घालून पुन्हा शाळेत पाठविले होते.
मात्र आठवडा उलटूनही कोणतीच सुधारणा न झाल्याने या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि.४) पुन्हा आक्र मक होत आयुक्तांच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे शेकडो विद्यार्थी सकाळीच पुन्हा सहा किलोमीटर अंतर पायपीट करीत पिंप्री सदो फाट्यावरील विश्रामगृहावर पोहचले. या बाबीची पोलिसांना कुणकुण लागल्यावर इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी धाव घेऊन विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी आदिवासी विभागाच्या उपायुक्तांना फोनवरून कळविले. उपायुक्त लाभेश सलामे यांच्यासह सुनील जगताप, व कार्यालयीन अधीक्षक युवराज गोरे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
संतप्त विद्यार्थ्यांनी उपायुक्तांना घेराव घालून आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी उपायुक्तांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत लवकरच शाळेला सर्व सुविधा पुरवण्याचे मान्य करीत शाळेत स्वत: भेट देऊन चौकशी करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.