विद्यार्थ्यांनी गिरवला ‘वाचाल तर वाचाल’चा धडा
By admin | Published: October 16, 2016 02:06 AM2016-10-16T02:06:49+5:302016-10-16T02:10:08+5:30
वाचन प्रेरणा दिन : शाळांमध्ये दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक पुस्तक वाचन
नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये दिवंगत राष्ट्रपती ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या चरित्र ग्रंथाचे सामूहिक वाचन केले. तसेच ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शन आदि कार्यक्रमदेखील राबविण्यात आले.
महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर
जनता सेवा मंडळ संचलित महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण होण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक यांनी शाळेस वाचनालयास ५0 पुस्तकांची भेट दिली. वाचनालयाच्या वतीने महापौरांचे आभार मानण्यात आले.
रचना विद्यालय
नाशिक येथील महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित रचना विद्यालय माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक सुचेता येवला, संगीता टाकळकर, सुनील गायकवाड यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मोहाडकर, अहिरे, खळे, कुलकर्णी, पारनेरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन गांगुर्डे यांनी केले.
नवरचना विद्यालय
महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित नवरचना विद्यालय प्राथमिक विभागात वाचन, प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र गोसावी व आशा वायकंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. माया आचार्य यांनी प्रास्ताविक केले. प्रीती चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.
रमाबाई आंबेडकर विद्यालय
रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड जयंती व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी अपरांती अकॅडमीचे संचालक डॉ. संजय अपरांती, रमाबाई विद्यार्थिनी वसतिगृहाचे सचिव पी. के. गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून झाली. त्याचप्रमाणे वाचन प्रेरणा दिनानिमित विद्यार्थिनींचे वाचन घेण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष करुणासागर पगारे, संस्थेचे सरचिटणीस हेमंत वाघ, वामनराव गायकवाड, नितीन भुजबळ आदि पालक शिक्षक संघ सदस्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कीर्ती कदम यांनी केले. माधुरी जाधव यांनी आभार मानले.
न्यू इरा स्कूल
न्यू इरा शाळेत डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयासंबंधी पुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी वाचनाचा आनंद घेतला. तसेच परिपाठाद्वारे डॉ. अब्दुल कलाम यांचा जीवनपरिचय करून दिला.
महात्मा गांधी विद्यामंदिर
जनता सेवा मंडळ संचलित महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर, येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गं. पां. माने संचालक सुनंदा माने, स्नेहलता येलमामे आदि उपस्थित होते. मुख्याध्यापक आशा जाधव यांनी वाचनाचे महत्त्व समजाविले.