‘त्या’ विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च पुणे विद्यापीठ उचलणार
By admin | Published: May 22, 2017 02:23 AM2017-05-22T02:23:55+5:302017-05-22T02:24:20+5:30
नाशिक :सचिन आव्हाड या रुग्णावर झालेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपणनंतर त्याच्या शिक्षणाचा खर्च पुणे विद्यापीठाने उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये सचिन आव्हाड (१९) या रुग्णावर नुकत्याच झालेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर त्याच्या कुटुंबीयांची हलाखीची परिस्थिती बघता त्याच्या शिक्षणाचा खर्च पुणे विद्यापीठाने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. केटीएचएमचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी सचिनची भेट घेतली. त्याची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला.
सचिन हा सिन्नर तालुक्यातील दापूर येथील रहिवासी असून, त्याचे मूत्रपिंड खराब झाल्याने त्याच्या आईने स्वत:चे एक मूत्रपिंड मुलास दान केले. त्यामुळे त्याच्यावर मूत्रपिंड शस्त्रक्रिया होऊ शकली. आता त्याची प्रकृती ठीक आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.
सचिनचे वडील मनोरुग्ण असून, तो सिन्नर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याच्यावर ऋषिकेश हॉस्पिटल येथील डॉ. भाऊसाहेब मोरे, डॉ. संजय रकिबे, डॉ. नंदन विळेकर, डॉ. प्रतीक्षित महाजन, डॉ. प्रणव छाजेड, डॉ. अनिरुद्ध ढोकरे, डॉ. श्याम पगार यांनी शस्त्रक्रिया केली.
ऋषिकेश हॉस्पिटलतर्फे कार्यक्रमात डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हॉस्पिटलचे कर्मचारी, रुग्णाचे नातेवाईक व नागरिक उपस्थित होते.