विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच
By admin | Published: September 9, 2015 11:54 PM2015-09-09T23:54:53+5:302015-09-09T23:55:08+5:30
आयुक्त कार्यालयाला ठोकले ताळे
नाशिक : वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी, तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून सुरू असलेले अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे ठिय्या आंदोलन काल (दि.९) रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.
दरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांकडे कोणी अधिकारी न फिरकल्याचे कारण देऊन आंदोलकांनी आदिवासी विकास आयुक्तालयाला काल टाळे ठोकले. टाळे ठोकल्यानंतरही आदिवासी विकास विभागाने याकडे लक्ष दिले नसल्याचे चित्र होते.
आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या वसतिगृहांमध्ये अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळण्याच्या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून आदिवासी विकास विभाग कार्यालयात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेने या विद्यार्थ्यांसह आदिवासी विकास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
यासंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १७ आॅगस्ट व २५ आॅगस्ट रोजी यासंदर्भात आंदोलन करण्यात येऊन आदिवासी आयुक्तांना निवेदन दिले आहे. आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश मिळालेला नाही. शासकीय वसतिगृहात विद्यार्थी राहतात.
शैक्षणिक सत्र चालून होऊनही स्टेशनरी, इंजिनिअरिंग आणि डी.एड. आणि बी.एड.च्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत गणवेशसाठी भत्ता देण्यात आलेला नाही. तसेच जानेवारी-फेब्रुवारीपासून जुन्या व नवीन विद्यार्थ्यांना मासिक निर्वाह भत्ता देण्यात आलेला नाही. पेठरोड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाची क्षमता ५०० विद्यार्थ्यांची आहे. त्याठिकाणी १०० विद्यार्थिनींसाठी एक गृहपाल, एक लिपिक व सफाईदार व चौकीदार देण्यात यावा. वसतिगृहातील निवासाची सोय व्यवस्थित नाही. त्यामुळेच यासंदर्भात प्रशासनाने तातडीने लक्ष पुरवून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी व आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात, आदि मागण्यांचा त्यात समावेश होता.
यावेळी संघटनेचे लक्ष्मण जाधव, योगेश शेवरे, विशाल माळेकर यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन काल रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. (प्रतिनिधी)