उच्चशिक्षणमंत्र्यांची मोटार अडविण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 01:22 AM2020-09-21T01:22:02+5:302020-09-21T01:22:36+5:30
महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न गंगापूर येथे करण्यात आला. तसेच काळे झेंडे दाखवून घोषणाबाजीदेखील करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडले.
नाशिक : महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न गंगापूर येथे करण्यात आला. तसेच
काळे झेंडे दाखवून घोषणाबाजीदेखील करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडले. तथापि, चर्चा न करता केवळ राजकारण म्हणून आंदोलन करण्याचा हा प्रकार विद्यार्थी नेते अनाठायी करीत आहेत. मात्र, त्यांच्या दादागिरीला आपण घाबरणार नाही, असे सामंत यांनी पत्रकारांना सांगितले.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात उदय सामंत रविवारी (दि.२०) यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठात आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. त्यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न करणाºया कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. त्याचवेळी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सुडबुद्धीने राजकीय दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप अभाविपने केला असून विद्यार्थी हिताचे निर्णय घेऊ शकत नसेल तर सामंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सामंत यांच्या दौºयात ठिकठिकाणी अभाविपचे कार्यकर्ते त्यांना भेटून निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर दडपशाहीने त्यांना अटक केली जाते, असा आरोपदेखील स्वप्नील बेगडे यांनी केला आहे.
सामंत यांनी मात्र अभाविपचे आरोप फेटाळले असून, आपण अनेक ठिकाणी दौºयावर गेल्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते मोटार अडवून शिवीगाळ करतात, त्यांना कोणत्याही मागण्यांवर चर्चा करायची असेल तर आपली त्यांना भेटण्याची तयारी आहे. मात्र अकारण दादागिरी सहन केली जाणार नाही असे ते म्हणाले. या तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांचे भवितव्य अडचणीत मी आणणार नाही, मात्र केवळ आंदोलने करण्याचा दिखावूपणा बंद केला पाहिजे.
महाविद्यालयीन
शुल्क कमी करणार
महाविद्यालयीन शुल्क कमी करण्याची अभाविपची मागणी आहे, मात्र अगोदरच त्यावर विचार सुरू आहे, त्यावर अशाप्रकारे आंदोलने करण्याची गरज नसल्याचे सामंत यांनी सांगितले.
नेत्यांच्या नजरेत येऊन पदे मिळवण्यासाठी तसेच जे निर्णय अगोदरच शासन पातळीवर होत आहे, ते आपल्या आंदोलनामुळे होत असल्याचे भासविण्यासाठी अशी आंदोलने करू नये, असे त्यांनी सांगितले.
इन्फो...