नायलॉन मांजा न वापरण्याची विद्यार्थ्यांना शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:33 PM2020-01-11T23:33:03+5:302020-01-12T01:28:52+5:30
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाने नायलॉन मांजाविरोधी मोहीम सुरू करत मकरसंक्रांतीला पतंग उडविताना नायलॉन मांजा वापरणार ...
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाने नायलॉन मांजाविरोधी मोहीम सुरू करत मकरसंक्रांतीला पतंग उडविताना नायलॉन मांजा वापरणार नाही, वापरून देणार नाही अशी शपथ ३०० विद्यार्थ्यांनी घेतली.
नायलॉन मांजामुळे पर्यावरणातील पशुपक्षी, लहान मुले व माणसे यांना इजा होऊन मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडल्या आहेत. म्हणून नायलॉन मांजावर बंदी टाकण्याचा निर्णय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच गाव परिसरात विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजाच्या विरोधात मोहीम उघडून जनजागृती केली.
मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली. त्यांनी नायलॉन मांजा वापराचे दुष्परिणाम स्पष्ट केले. या मोहिमेला पालकांसह परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावात नायलॉन मांजा उपलब्ध होणार नाही याची खबरदारी विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतली. आम्ही सर्व विद्यार्थी अशी शपथ घेतो की, पतंग उडविण्यासाठी आजपासून आम्ही नायलॉन मांजा वापरणार नाही आणि अशाप्रकारे नायलॉन मांजा कुणी वापरत असेल तर मी त्यांना त्यापासून परावृत्त करेल. माणसांना व पक्ष्यांना वेदना देणाऱ्या या मांजाविरोधात जनजागृती करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. तसेच वाहनाची वर्दळ असलेल्या ठिकाणी मी पतंग उडवणार नाही. मोकळे मैदान आणि तत्सम जागांवरच मी नायलॉन मांजाशिवाय पतंग उडवेल अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, आर. आर. गिते, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे आदी उपस्थित होते.