अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाच्या भाग दोन प्रक्रियेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:26 PM2020-08-09T17:26:34+5:302020-08-09T17:29:47+5:30
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी रविवारी (दि.०९) सायंकाळपर्यंत सुमारे २८ हजार ६६४ अर्जांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी २० हजार २१४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जातील भाग एक भरला असून १८ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी संबंधित मुख्याध्यापकांकडून ऑनलाइन पडताळणीही करून घेतली आहे. या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
नाशिक : महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६० महाविद्यालयांमध्ये उपलब्ध २५ हजार २७० जागांवर अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी रविवारी (दि.०९) सायंकाळपर्यंत सुमारे २८ हजार ६६४ अर्जांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी २० हजार २१४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जातील भाग एक भरला असून १८ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी संबंधित मुख्याध्यापकांकडून ऑनलाइन पडताळणीही करून घेतली आहे. या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध एकूण २५ हजार २७० जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेत ऑनलाइन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या सुमारे २० हजार २१४ विद्यार्थंनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरून त्यांचे ऑनलाइन अर्ज लॉक के ले आहेत. त्यापैकी १८ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जांची ऑनलाइन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून घेतली असून, आता त्यांना अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. ऑनलाइन प्रवेश अर्जाच्या भाग दोनमध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पर्याय निवडावा लागणार आहे. यात विद्यार्थ्यांना शहरातील विविध ६० महाविद्यालयांमध्ये ११ हजार ५५० अनुदानित, ८ हजार १६० विनाअनुदानित, ५ हजार ३२० स्वयंअर्थसाहाय्यच्या जागा उपलब्ध आहेत. यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या १० हजार १६०, वाणिज्यच्या ८ हजार ६००, कलाशाखेच्या ४ हजार ९१० व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या (एचएसव्हीसी) १३६० जागांचा समावेश आहे. यातील योग्य पर्याय निवडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचा भाग दोन भरावा लागणार आहे. परंतु, अद्याप भाग दोनच्या प्रक्रियेविषयी शिक्षण विभागाने कोणतीही सूचना दिलेली नसल्याने विद्यार्थांना भाग दोनची प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन नोंदणी करून आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरता येणार आहे.