विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाचे धान्य वाटप करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:38 PM2020-03-28T23:38:04+5:302020-03-28T23:38:29+5:30
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मध्यान्ह भोजनासाठी दिले जाणारा पोषण आहार शाळांच्या पातळीवर पडून असल्याची बाब लक्षात आल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदरचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मध्यान्ह भोजनासाठी दिले जाणारा पोषण आहार शाळांच्या पातळीवर पडून असल्याची बाब लक्षात आल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदरचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय पातळीवरच याचे वाटप होणार असले तरी, वाटपाच्या वेळी विद्यार्थी व पालकांनी गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत देशासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. त्यात गर्दी टाळण्यासाठी १६ मार्चपासूनच शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
शाळा बंद झाल्याने विद्यार्थी मध्यान्हातील पोषण आहारापासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने देशातील शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचे आदेश सरकारला दिले असून, शालेय विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखण्यासाठी शालेय स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व कडधान्यसाठा शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णातील हंगामी वसतिगृह व शाळांमध्ये शिल्लक असलेला धान्य साठा वाटप करण्याचे आदेश नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.
धान्य वाटप करत असताना शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेची सक्तीने पालन करण्याची खबरदारी शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व पोषण आहार कामकाज पाहणारे शिक्षकांनी घ्यावी. शालेय स्तरावर धान्य व कडधान्य वाटप करण्याबाबत पूर्व कल्पना पोलीस विभाग व तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका पोलिसांना देण्यात येऊन याबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीस देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. एक मीटरपेक्षा जास्त अंतर हवे
शालेय स्तरावर उपलब्ध असलेला धान्य व कडधान्य शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती तथा पोषण आहाराचे काम पाहणारे शिक्षकांनी सर्व विद्यार्थी तथा पालक यांना समप्रमाणात वाटप करावे त्याचबरोबर शाळास्तरावर धान्य वाटप करण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्धी करण्यात यावी व शालेय स्तरावर धान्य घेण्यासाठी एकाच दिवशी विद्यार्थी व पालक यांची गर्दी होणार नाही यासाठी टप्प्या टप्प्याने वाटप करण्यात यावे, विद्यार्थी व पालक धान्य घेण्यास आल्यास त्यांच्यातील एकमेकांपासूनचे अंतर एक मीटरपेक्षा जास्त राहील याची काळजी घेण्यात यावी.