विद्यार्थ्यांना वाटणार सहा हजार लाडू
By Admin | Published: August 14, 2014 11:22 PM2014-08-14T23:22:28+5:302014-08-15T00:33:58+5:30
विद्यार्थ्यांना वाटणार सहा हजार लाडू
घोटी : देशभर ६८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यासाठी संपूर्ण भारतवासीय सज्ज झालेले असताना घोटीतील एक कुटुंब गेल्या चार दिवसांपासून एका अनोख्या उपक्रमासाठी अहोरात्र राबत असल्याचे दिसत आहे.
या कुटुंबातील एका युवकाचे दोन वर्षांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्यदिनी अपघातात निधन झाले होते. मात्र हे दु:ख उराशी न बाळगून एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने देशाच्या स्वातंत्र्यदिनी त्याच्या स्मरणार्थ शाळकरी मुलांना मिष्टान्नाचे वाटप करावे, अशी संकल्पना घरातील व्यक्तींनी मांडली आणि या संकल्पनेस घरातील सर्व सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या वर्षापासून दर स्वातंत्र्यदिनी सर्व शाळेत लाडू आणि चॉकलेटवाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे सर्व कुटुंब गेल्या आठवड्यापासून शुद्ध तुपातील लाडू करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
घोटी येथील टोल नाका परिसरात शहरातील ज्ञानेश्वर बजरंग भोर यांचे साईश्रद्धा नामक हॉटेल आहे. ज्ञानेश्वर यांचा लहान भाऊ भाऊसाहेब यांचे दोन वर्षांपूर्वी नांदगावसदो फाट्यावर अपघाती निधन झाले. त्यांच्या या अपघाती मृत्यूने भोर कुटुंब पूर्णपणे कोसळले. मात्र त्यातून सावरत त्यांनी भाऊसाहेब यांच्या स्मृती जतन करण्याचा वेगळाच प्रयत्न केला. त्यासाठी भाऊसाहेब यांच्या स्मृतिदिनी विविध सेवाभावी उपक्रम राबवून त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला.
मात्र देशप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा ही जोपासत त्यांनी भाऊसाहेबच्या वयातील मुलांना देशाचा स्वातंत्र्यदिन आनंदात साजरा करावा व या मुलांना मिष्टान्न मिळावे या उद्देशाने भोर कुटुंबीयांनी आपल्या व्यवसायाकडे काणाडोळा करीत याच हॉटेलात शुद्ध तुपापासून लाडू बनविण्यासाठी सुरुवात केली असून, उद्या घोटीतील सर्व शाळेतील मुलांना त्याचे वाटप केले जाणार आहे.
एकीकडे घरातील कर्ता मुलगा गेल्याने डोळ्यात आसू, तर दुसरीकडे देश स्वतंत्र होऊन ६८ वर्ष उलटली म्हणून हसू अशा अवस्थेत हे कुटुंब भाऊसाहेब यांच्या स्मृती
जपत लाडू बनविण्यात गर्क असल्याचे दिसत होते. (वार्ताहर)