लस नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:12 AM2020-12-23T04:12:21+5:302020-12-23T04:12:21+5:30
नाशिक : शहरासह जिल्हाभरात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असली तरी विद्यार्थ्यांचे ...
नाशिक : शहरासह जिल्हाभरात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असली तरी विद्यार्थ्यांचे पालक मात्र अजूनही मुलांना शाळेत पाठविण्यास सकारात्मक नसल्याचे चित्र दिसून येत नाही. नाशिक पालक संघटनेने जोपर्यंत विद्यार्थ्यांना कोरोना लस नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही, अशी भूमिका घेतल्याने शहरासह जिल्हाभरातील किती पालक मुलांना शाळेत पाठविणार, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नाशिक पालक संघनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २२) शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेत पालक व विद्यार्थ्यांच्या अडचणी निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी पालक संगटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासगी विनाअनुदानित स्वयंअर्थसाहाय्यित शाळांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष वार्षिक शैक्षणिक खर्चाएवढेच शैक्षणिक शुल्क आकारणी करावी, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्यात यावी, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात केवळ ५० टक्के अभ्यासक्रमाला मान्यता द्यावी आदी मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून केल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र पालक संघटनेच्या शीतल चव्हाण, नाशिक पालक संघटनेचे अध्यक्ष नीलेश साळुंखे, समन्वयक डॉ. प्रदीप यादव, सल्लागार राजेश बडनखे, अशोक पाटील आदी उपस्थित होते.
(आरफोटो-२२एनपीए) शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देताना नाशिक पालक संघटनेचे समन्वयक डॉ. प्रदीप यादव व सल्लागार राजेश बडनखे.