विद्यार्थी विनापरीक्षा पास होणार, मूल्यांकन कसे करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:15 AM2021-04-20T04:15:34+5:302021-04-20T04:15:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोना-१९ आजाराचा वाढता संसर्ग लक्षात घेत पाहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना-१९ आजाराचा वाढता संसर्ग लक्षात घेत पाहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकारणे या वर्गाच्या परीक्षा रद्द केल्या असून, आरटीई कायद्यानुसार उत्तीर्ण असा शेरा देऊन गुणपत्रक तयार करण्याच्या सूचना शाळांना केल्या आहेत. ही प्रक्रिया पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मात्र ज्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन झालेले नाही त्यांच्यासाठी शक्य असली तरी नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन व गुणपत्रक कसे तयार करणार यासंदर्भात शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी परिपत्रक काढून मूल्यमापन कसे करावे? याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. त्यानुसार ज्या शाळांनी आकारिक मूल्यमापन (अंतर्गत चाचणी व तोंडीपरीक्षा) करून गुणदान केलेले आहे. त्यांनी आकारिक मूल्यमापनाच्या गुणानुसार विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करावे? तसेच पहिली ते आठवीच्या ज्या शाळांनी आकारिक मूल्यमापनदेखील केलेले नाही अशा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर आरटीई कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गोन्नोत असा शेरा द्यावा, असे सूचित केलेले आहे. त्याचप्रमाणे नववी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणांच्या गुणदान कसे करावे? याचे मार्गदर्शन केलेले आहे. त्यानुसार गुणपत्रक तयार करावे? असे सूचित केलेले आहे. परंतु ज्या शाळांनी अंतर्गत मूल्यमापन केलेले नाही त्यांची गुणपत्रक तयार करण्याविषयी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. कारण आरटीई कायदा आठवीपर्यंत लागू आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही विद्यार्थ्यास नापास करू नये आणि पुनश्च नव्याने ऑनलाइन अथवा ऑफलाइन मूल्यमापन करू नये असे सूचित केलेले आहे. त्यामुळे अजूनच गोंधळ निर्माण झालेला आहे. नववी व अकरावी मूल्यामापनाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
कोट
- ज्या शाळांनी नववी व अकरावीचेअंतर्गत मूल्यमापन केलेले नाही, त्यांना किमान २० गुणांचे व्हॉट्सॲप, ऑनलाइन मूल्यमापन करण्याची परवानगी दिल्यास त्याचे १०० गुणांमध्ये रूपांतर करता येईल किंवा सरसकट या वर्गाच्या विद्यार्थ्यांना आरटीईनुसार शेरा देऊन गुणपत्रक देण्याची परवानगी द्यावी म्हणजे मुख्याध्यापक शिक्षकांचा संभ्रम राहणार नाही.
- एस. बी. देशमुख, सचिव, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ
कोट -
नाशिक जिल्ह्यात शाळा जानेवारीत उशिरा सुरू झाल्या आणि मार्चमध्ये लगेच बंद करण्यात आल्या. या कालावधीत शिक्षकांना अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांची मानसिकता स्थिर करावी लागली. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन करता आले नाही. त्यामुळे मूल्यामापनाबाबत शिक्षण आणि विभागाने ठोस निर्णय घ्यावा.
-पी. के. धुळे, कार्याध्यक्ष, निफाड तालुका मुख्याध्यापक संघ
इन्फो -
मूल्यमापन करण्याची संधीच शाळांना मिळाली नाही.
शासनाने शाळा सुरू करताना केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थांच्या जवळ जाऊ नये. वही, पेन, पेन्सिल इतर साहित्याची देवाण-घेवाण करू नये. स्वाध्याय वह्या जमा करू नये/कोणत्याही परीक्षा घेऊ नये असे सूचित केलेले होते, परिणामी बहुतेक शाळांनी फक्त अध्यापन केले. मूल्यमापन करण्याची संधीच शाळांना मिळाली नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.