मुख्य बाजारासह उपबाजार आणखी काही दिवस बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:13 AM2021-05-23T04:13:12+5:302021-05-23T04:13:12+5:30
सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारासह उपबाजार सुरु करण्यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र लिलाव सुरु करण्यापूर्वी शेतकरी, व्यापारी, ...
सिन्नर: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारासह उपबाजार सुरु करण्यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र लिलाव सुरु करण्यापूर्वी शेतकरी, व्यापारी, एजंट, कर्मचारी, हमाल, मापारी यांच्या कोरोना टेस्ट करण्यासाठी दोन-तीन दिवस वेळ लागणार असल्याने तूर्तास बाजार समितीच्या आवारात लिलाव सुरु होणार नसल्याची माहिती बाजार समितीचे सभापती लक्ष्मण शेळके, उपसभापती संजय खैरनार, सचिव विजय विखे यांनी दिली. सिन्नर बाजार समितीच्या मुख्य बाजारासह नांदूरशिंगोटे, दोडी, पांढुर्ली, नायगाव, वडांगळी व वावी येथील उपबाजार सुरु करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या वाहनांना टोकण देण्यासह त्यांच्या काेरोना टेस्ट करून प्रवेश देऊन बाजार समिती सुरु करण्याचे ठरले होते.
-------------------------------
विविध उपाययोजना
जिल्हाधिकाऱ्यांनी २१ मे रोजी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांच्या सचिवांची बैठक घेऊन लिलाव सुरु करण्यापूर्वी शेतकरी, व्यापारी, एजंट, हमाल, मापारी, कर्मचारी व अधिकारी यांची रॅपिड टेस्ट घेण्याच्या सूचना केल्या होत्या. तथापि, या सर्वांच्या रॅपिड टेस्ट करण्यासाठी टेस्ट किट, तपासणी कर्मचारी वर्ग उपलब्ध करणे व उपाययोजना करण्यासाठी अजून किमान दोन ते तीन दिवस लागणार आहे. त्यामुळे तूर्तास बाजार समिती सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरात लवकर ही सर्व कार्यवाही करुन बाजार समिती सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे बाजार समितीचे सभापती लक्ष्मण शेळके, उपसभापती संजय खैरनार, सचिव विजय विखे यांनी सांगितले.