उपकेंद्राचे लवकरच सिडको भागात स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:18 AM2019-05-28T00:18:01+5:302019-05-28T00:19:25+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र कार्यालयाच्या इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, विद्यापीठ प्रशासनाने सिडकोतील शाळा क्रमांक ६८ मधील जागेसाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाला
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र कार्यालयाच्या इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, विद्यापीठ प्रशासनाने सिडकोतील शाळा क्रमांक ६८ मधील जागेसाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाला असून, त्यामुळे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी प्रशस्त जागा उपलब्ध झाली आहे.
शहरातील तिबेटियन मार्केट येथील जुन्या इमारतीमध्ये उपकेंद्राचे कार्यालय कार्यरत आहे. येथे पार्किंगसह अन्य सोयी-सुविधांच्या अभावामुळे विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम चालविण्यासाठी अनेक मर्यादा आहेत. प्रशासकीय कामकाजाची पूर्तता करण्यात अडचणी येत असल्याने विद्यापीठ प्रशासनाने नवीन पर्यायी जागा शोधण्याची मोहीम सुरू केली होती. यात प्रारंभी नाशिकरोड परिसरातील एका इमारतीविषयी कार्यवाही सुरू होती. परंतु कार्यालय स्थलांतरणास विद्यार्थी संघटनांकडून विरोध झाल्याने सिडकोतील मनपा शाळेच्या जागेविषयी विद्यापीठ प्रशासनाने महापालिकेला प्रस्ताव पाठविला होता. परंतु, संबंधित प्रस्ताव तांत्रिक बाबींमध्ये अडकल्याने उपकेंद्राचे कार्यालय आहे, त्याच ठिकाणी सुरू ठेवण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर आली होती. त्यासोबतच सिडकोतील जागा उपलब्ध होण्याच्या अपेक्षेने विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेला एमबीएचा अभ्यासक्रम चालविण्याचे आव्हानही प्रशासनासमोर उभे राहिले होते.
पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त होणार
अनेक अडचणीतून सद्यस्थितीत मार्ग निघाला असून, महापालिके ला शाळा क्रमांक ६८च्या जागेसाठी पाठविलेला प्रस्ताव गेल्या सप्ताहात मंजूर झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने शाळेच्या जागेचा ताबा घेऊन त्याठिकाणी देखभाल दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या नवीन जागेवर विद्यापीठ उपकेंद्र सुरू होणार असल्याने विद्यापीठ उपकेंद्राला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे.