कोरोनाविषयी जनजागृतीसाठी सुभाष जांगडा धावले नाशिक ते शिर्डी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:26+5:302020-12-27T04:11:26+5:30
कोरोनाविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा यांनी शनिवारी (दि.२६) नाशिक ते शिर्डी ...
कोरोनाविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा यांनी शनिवारी (दि.२६) नाशिक ते शिर्डी हे ९० किलोमीटरचे अंतर अवघ्या १० तास आणि ४८ मिनिटांमध्ये धावत पूर्ण करून कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी साईचरणी साकडे घातले.
नाशिकच्या सातपूर येथील दत्त मंदिरात सुभाष जांगडा यांनी शनिवारी (दि.२६) पहाटे ४.३० वाजता दर्शन घेऊन धावण्यास सुरुवात केल्यानंतर दुपारी ३.१२ वाजेच्या सुमारास त्यांनी नाशिक ते शिर्डी अंतर पूर्ण करत शिर्डी येथे साईबाबा यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ सल्लागार जयपाल शर्मा, दादा देशमुख, विशाल पाठक, राजेंद्र सहानी, राजेश इसर्वाल, राजवीर जांगडा, राहुल जांगडा, योगीता निकम राजपूत, रूपाली मुंढे, दिनेश जांगडा, नवीन वर्मा, सचिदानंद शुक्ल आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदवत त्यांच्या सोबत धावण्याचा आनंद घेतला. गेल्या पाच वर्षांपासून सुभाष जांगडा हे नाशिक ते शिर्डी विविध सामाजिक संदेश देण्यासाठी धावत असतात. सुभाष जांगडा यांचे यंदाचे सहावे वर्ष असून, त्यांनी यावेळी कोरोनाविषयक जनजगृतीच्या उद्देशाने हे अंतर धावून पूर्ण केले. यापूर्वी जांगडा यांनी बेटी बचाव, बेटी पढाओ, स्री भ्रूण हत्या, स्वच्छ भारत अभियान, पाणी बचाव मोहीम याबाबत जनजागृतीसाठी धावण्याचा उपक्रम पूर्ण करताना त्यांनी कोरोनाविषयक दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
(आरफोटो-२६ जांगडा) धावपटू सुभाष जांगडा यांचा सत्कार करताना नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड. समवेत जयपाल शर्मा, दादा देशमुख, विशाल पाठक, राजेंद्र सहानी, राजेश इसर्वाल, राजवीर जांगडा, राहुल जांगडा, योगीता निकम राजपूत, रूपाली मुंढे, दिनेश जांगडा, नवीन वर्मा, सचिदानंद शुक्ल आदी