नाशिकच्या सिडको विभागातील रखडलेल्या प्रश्नांबाबत अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:07 PM2018-02-16T13:07:12+5:302018-02-16T13:15:15+5:30
रखडलेल्या प्रश्नांबाबत सर्व अहवाल तयार करून तो वरिष्ठांना पाठविण्यात आला
नाशिक : सिडको प्रशासनाच्या अखत्यारितील टपरी प्लॉट, नागरिकांच्या घरालगतच्या मोकळ्या जागांसह इतर रखडलेले प्रश्न मार्गी लागावे यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. रखडलेल्या प्रश्नांबाबत सर्व अहवाल तयार करून तो वरिष्ठांना पाठविण्यात आला असून, यातून लवकर प्रश्न मार्गी लागणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सिडको प्रशासनाच्या ताब्यातील योजना क्रमांक एक ते सहा या मनपाकडे हस्तांतरित करण्यात आल्या असून, बांधकाम परवानगीचेही अधिकार आता मनपाकडे देण्यात आले आहे, परंतु आताच्या स्थितीत सिडकोच्या अखत्यारित असलेले व गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. यात प्रामुख्याने सिडकोतील सर्वसामान्य नागरिकांचा टपरी प्लॉटचा प्रलंबित प्रश्न अद्यापही सुटला नसल्याने सर्वसामान्य विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पूर्वी छोट्या प्लॉटसाठी बांधकाम परवानगीचा दाखला बंधनकारक नव्हता. परंतु २०१० पासून यात बदल करून हा नियम टपरी प्लॉटलाही लागू करण्यात आला आहे. याबरोबर नागरिकांच्या घरालगत असलेल्या मोकळ्या जागांचा प्रश्न रखडलेला असून, यात काही नागरिकांनी सिडकोकडे जागेची रक्कम भरली असूनही ती जागा अद्याप त्यांच्या नावावर करण्यात आली नसल्याचे समजते. याबाबतही सिडकोने सर्व्हे करून घरालगतच्या जागांची नियमानुसार विक्री करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे.