सुब्रह्मण्यम स्वामी : इस्कॉन मंदिराच्या सोहळ्यात प्रतिपादन मंदिरांच्या निर्माणासाठी सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:11 AM2017-11-13T01:11:06+5:302017-11-13T01:12:20+5:30
अयोध्या, मथुरा आणि वाराणसी या तीन शहरांमधील मंदिरांच्या उभारणीसाठी हिंदुस्थानच्या रहिवाशांनी सहकार्य करावे. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराची वास्तू लवकरच साकार झालेली अवघ्या हिंदुस्थानात दिसून येईल, असे प्रतिपादन भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केले.
नाशिक : अयोध्या, मथुरा आणि वाराणसी या तीन शहरांमधील मंदिरांच्या उभारणीसाठी हिंदुस्थानच्या रहिवाशांनी सहकार्य करावे. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराची वास्तू लवकरच साकार झालेली अवघ्या हिंदुस्थानात दिसून येईल, असे प्रतिपादन भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केले.
वैद्यनगर येथील श्री राधा मदनगोपाल इस्कॉन मंदिरात भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, मंदिराचे विश्वस्त शिक्षाष्टकम प्रभू उपस्थित होते. यावेळी स्वामी बोलताना म्हणाले, हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी आणि रामराज्याच्या स्थापनेसाठी सर्वांनी एकजूट होऊन ताकद उभी करावी. या हिंदुस्थानात अनेकांनी सत्ता गाजवली मात्र हिंदुत्व रुजलेल्या या मातीने कोणावरही अन्याय व अत्याचार होऊ दिला नाही. मुघलांनी या देशात साडेसातशे वर्षे सत्ता गाजविली तरीदेखील देशात हिंदू धर्म अस्तित्वात राहिला, याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्टÑातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते राजस्थानच्या महाराणा प्रताप यांच्यापर्यंत विविध योद्ध्यांनी दिलेला लढा आहे, असेही स्वामी यावेळी म्हणाले. हिंदू आतंकवादाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण या धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता असून, हा ग्रंथ आतंकवादाची शिकवण देत नाही, हे पी. चिदंबरम यांनी लक्षात घ्यावे, कारण त्यांना ‘हिंदू आतंकवाद’ लवकरच अनुभवयास मिळणार आहे. दरम्यान, या सोहळ्याप्रसंगी वीसपेक्षा अधिक मुख्याध्यापकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरम्यान, प्रथम क्रमांकाचे पंधरा हजार रुपयांचे पारितोषिक काशीनाथ महाजन यांनी पटकाविले. तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे अकरा हजार व पाच हजार रुपये वैशाली बहिकर आणि संदीप पीतांबर यांना देण्यात आले. याप्रसंगी शिक्षाष्टकम यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षाष्टकम यांनी सुब्रह्मण्यम यांच्याविषयी मनोगत व्यक्त करताना ते सैनिक असून, त्यांच्याकडून हिंदू धर्म-संस्कृतीचे रक्षणाचे कार्य केले जात आहे, असे सांगितले.