दुर्मीळ उदमांजराला पकडण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 01:11 PM2019-11-27T13:11:51+5:302019-11-27T13:12:03+5:30
येवला : शहरानजीक असलेल्या रेल्वे स्थानकासमोर एका शेतात दुर्मीळ अशा उदमांजराला पकडण्यात प्राणिमित्रास यश आले असून, या उदमांजरास वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
येवला : शहरानजीक असलेल्या रेल्वे स्थानकासमोर एका शेतात दुर्मीळ अशा उदमांजराला पकडण्यात प्राणिमित्रास यश आले असून, या उदमांजरास वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकासमोरील योगेश शिंदे यांच्या शेतात सोमवारी (दि.२५) सायंकाळी एक दुर्मीळ उदमांजर अन्न पाण्याच्या शोधात आले. ह्यावेळी शिंदे यांचे कुटुंबीय शेतात काम करीत असताना त्यांना ते दिसले. रानमांजर आहे असे समजून सर्वांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मांजर शेतातील सीमेंटच्या पाइपमध्ये शिरले. ते बाहेर येत नसल्याने शिंदे कुटुंबीयांनी शहरातील प्राणिमित्र संजय लाहुरे यास फोन करून बोलाविले. लाहुरे यांनी पाइपजवळ जाऊन त्यास पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु बराच वेळ होऊनही त्या उदमांजरास पकडण्यात यश मिळत नव्हते. अखेरीस प्राणिमित्र लाहुरे यांनी त्यांच्याजवळ असलेला पिंजरा आणून त्या ठिकाणी लावला आणि रात्री उशिरापर्यंत त्याला पकडण्यात आले. यावेळी सोमनाथ गुंड, जगदीश भालेरे, कृष्णा गाडेकर, निखिल परदेशी, योगेश लुळेकर, आकाश परदेशी, योगेश शिंदे आदींचे सहकार्य लाभले. या घटनेची वनविभागास माहिती देण्यात आल्यानंतर वनविभागाचे दामोदर अहिरे, पंकज नागपुरे व के.के. गायकवाड हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी उदमांजरास ताब्यात घेऊन जंगलात सुरक्षितस्थळी सोडून दिले.
---------------------
उदमांजर हा प्राणी प्रामुख्याने रात्री वावरतो. जंगलात बीळ करून राहणारा हा प्राणी सस्तन व मांसाहारी प्राणी असून, उंदरासारखे लहान प्राणी, पक्षी, कीटक हे त्याचे खाद्य आहे. बदलत्या हवामानामुळे हे उदमांजर शहराकडे आले असावे.
- संजय लाहुरे, प्राणिमित्र, येवला