पहिल्याच प्रयत्नातील यश प्रेरणादायी: कार्तिकेय पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 10:56 PM2020-02-29T22:56:51+5:302020-02-29T23:03:05+5:30

नाशिक : संगीत वात्सल्य हे मी स्वत: दिग्दर्शित केलेले पहिलेच नाटक होते. त्याच नाटकाने अनपेक्षितपणे थेट राज्य बालनाट्य स्पर्धेतील अव्वल पुरस्कार मिळविल्याने माझ्या पुढील कारकिर्दीसाठी हे यश आणि पुरस्कार खूप प्रेरणादायी ठरणार असल्याचे युवा दिग्दर्शक कार्तिकेय पाटील याने सांगितले.

 The success of the first attempt is inspiring: Kartikeya Patil | पहिल्याच प्रयत्नातील यश प्रेरणादायी: कार्तिकेय पाटील

पहिल्याच प्रयत्नातील यश प्रेरणादायी: कार्तिकेय पाटील

Next
ठळक मुद्दे‘संंगीत वात्सल्य’ला राज्य पुरस्कारसंपुर्ण टीमच्या कष्टाचे फळ

नाशिक : संगीत वात्सल्य हे मी स्वत: दिग्दर्शित केलेले पहिलेच नाटक होते. त्याच नाटकाने अनपेक्षितपणे थेट राज्य बालनाट्य स्पर्धेतील अव्वल पुरस्कार मिळविल्याने माझ्या पुढील कारकिर्दीसाठी हे यश आणि पुरस्कार खूप प्रेरणादायी ठरणार असल्याचे युवा दिग्दर्शक कार्तिकेय पाटील याने सांगितले.

कृपा संस्थेच्या माध्यमातून नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभिनेत्री पूनम पाटील यांचे राज्य पुरस्कारांमध्ये झळकण्याचे स्वप्न होते. आईचे हे स्वप्न त्यांच्या मुलाने अर्थात कार्तिकेयने दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात सत्यात आणून दाखविले. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न: ‘संगीत वात्सल्य’ या नाटकाचे दिग्दर्शन करावे, असे का वाटले?
पाटील: कृपा संस्थेच्या माध्यमातून माझी आई दरवर्षी बालनाट्य स्पर्धेत भाग घ्यायची. त्यात काही वैयक्तिक बक्षिसे मिळायची. मात्र, नाटकाला बक्षीस मिळत नव्हते. दरम्यान, आई यंदा राज्यनाट्य स्पर्धेत भाग घेणार असल्याने तिला यंदा बालनाट्य स्पर्धेचे दिग्दर्शन करायला वेळ मिळणार नसल्याने मीच दिग्दर्शन करायचे असे ठरवले. त्यासाठी आधी संहिता शोधली असता औरंगाबादच्या प्रा. नितीन गरुड यांचे हे संगीत नाटक खूप आवडले. ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीतनाट्य आणि चित्रपट पाहिल्यापासून माझ्या मनात संगीत नाटक करण्याचा विचार होता. त्यामुळेच हे नाटक हातात पडल्यावर मला खूप आनंद झाला.

प्रश्न: नाटकाच्या उभारणीसाठी कशाप्रकारे मेहनत घेतली?
पाटील: नाटकाची पार्श्वभूमी ही ‘छाऊ नृत्यशैली’वर आधारित असल्याने सर्वप्रथम ही नृत्यशैली म्हणजे काय, संगीत नाटकात काम करायचे तर स्वत: गायन शिकून घेणे, यासह अनेक बाबी शिकून घेतल्या. त्यानंतर कृपा संस्थेच्या मुलांना त्या शिकवण्यास प्रारंभ केला. मात्र, काही मुले गायनाला तर काही नृत्याला बिचकत असल्याने अनेकदा मुले नाटक सोडून देण्याचे प्रकार घडले. त्यामुळे पुन्हा नवीन मुलांसह नाटक उभे करावे लागले. तसेच न्याय देऊ शकणारे संगीतकार, नृत्य दिग्दर्शक अशी सारी सांगड घालत बसण्यासाठीच खूप वेळ गेला. मात्र, सारे काही जुळून आल्यानेच इतके मोठे यश मिळू शकले.

प्रश्न: नाटकाला इतके मोठे यश मिळण्याची अपेक्षा होती का?
पाटील: मी प्रथमच नाट्यदिग्दर्शन करीत असल्याने पुरस्कार मिळण्याची अपेक्षा प्रारंभी अजिबातच नव्हती. मात्र, एका स्पर्धेत उत्तेजनार्थ, एका स्पर्धेत तृतीय अशी पारितोषिके मिळाल्यावर उत्साह वाढला होता. त्यामुळे मागील स्पर्धांच्या अनुभवासह आम्ही लातूरच्या स्पर्धेत अत्यंत दमदार सादरीकरण केले. त्यावेळी परीक्षकांनीदेखील नाटक चांगले झाल्याचे सांगितल्याने बक्षीस मिळण्याची आशा निर्माण झाली. मात्र, पहिले बक्षीस जाहीर झाल्यावर प्रथम विश्वासच बसला नाही. पण हे संपूर्ण टीमच्या कष्टाचे फळ होते. त्यामुळेच हा पुरस्कार मला खूप प्रेरणादायी आणि भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

मुलाखत- धनंजय रिसोडकर

Web Title:  The success of the first attempt is inspiring: Kartikeya Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.