वनविभागाला यश : गिरणारे शिवारात प्रौढ बिबट्या पिंजऱ्यात कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 02:58 PM2019-03-11T14:58:16+5:302019-03-11T14:59:15+5:30
एका बिबट्याने मागील चार दिवसांपासून नागरी वस्तीकडे मोर्चा वळविला होता. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी एका शेतक-याला बिबट्याने जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नागरिकांमधून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
नाशिक : मागील चार दिवसांपासून गिरणारे, गंगाम्हाळूंगी गावांच्या परिसरात बिबट्याने संचार करत नागरी वस्तीकडे मोर्चा वळविल्याने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. दोन दिवसांपुर्वी बिबट्याने एका शेतक-याला जखमी केल्याने नागरिकांमध्ये भीती दाटली होती. या घटनेनंतर वनविभागाकडे नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली. त्यानुसार पिंजरा वनक र्मचाऱ्यांकडून वरिष्ठांच्या आदेशान्वये लावण्यात आला होता. या पिंज-यात सोमवारी (दि.११)पहाटे बिबट्या जैरबंद झाल्याने गावक-यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
गिरणारे गावाचा परिसरात डोंगररांगा व मोकळे भुखंड नाले, नद्या जवळ असून शेतीचा भागही मोठा आहे. जवळच काश्यपी, गंगापूर धरणांचा बॅकवॉटरचा परिसर मोठा आहे. त्यामुळे या भागात बिबट्याची भूक, तहान भागविण्यासाठी मुबलक संसाधने उपलब्ध आहेत. त्यामुळे या भागात बिबटे, कोल्हे, तरस यांसारख्या वन्यजीवांचा वावर आढळतो. एका बिबट्याने मागील चार दिवसांपासून नागरी वस्तीकडे मोर्चा वळविला होता. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी एका शेतक-याला बिबट्याने जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नागरिकांमधून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
गंगाम्हाळूंगी शिवारातील एका शेतात पिंजरा वनविभागाच्या कर्मचा-यांकडून तैनात करण्यात आला होता. या पिंज-यात पहाटे बिबट्याची प्रौढ साधारणत: पाच वर्ष वयाची मादी जेरबंद झाली. बिबट्याची मादी जेरबंद झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या भागात मादीची पिल्ले व बिबट नराचेही वास्तव्य असण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविली जात आहे.