दीड तासाच्या प्रयत्नांना यश : वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले प्राण
By admin | Published: December 25, 2014 01:17 AM2014-12-25T01:17:07+5:302014-12-25T01:17:25+5:30
विहिरीतून बाहेर येताच बिबट्याने ठोकली धूम
सोनांबे : सुमारे ५० फूट पाणी असलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीबाहेर काढलेल्या बिबट्याने बाहेर येताच जंगलाकडे धूम ठोकल्याची सिन्नर तालुक्यातल्या सोनांबे शिवारात घडली.
सोनांबे येथील बेंदवाडी शिवारात संपत घमाजी पवार यांची सुमारे ७० फूट खोल विहिर आहे. या विहिरीला सुमारे ५० फूट पाणी असून विहिरीला सिमेंट कॉँक्रीटने बांधकाम करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी संपत पवार आपल्या शेतातील कांदे दाखविण्यासाठी निवृत्ती पवार यांना सोबत घेऊन शेतात गेले होते. त्यांनी विहिरीत डोकावल्यानंतर विद्युत जलपंपाच्या मोटारीला असलेल्या वायररोपला बिबट्याने पंजाने व तोंडात धरलेले त्यांना दिसून आले. पवार यांनी विहिरीत डोकावताच बिबट्या डरकाळ्या फोडू लागला. त्यामुळे घाबरलेल्या पवार यांनी तातडीने विहिरीपासून बाजूला येत वस्तीजवळ असणाऱ्या अनिल पवार यांच्यासोबत मोबाइलवर संपर्क साधून विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती दिली.
संपत पवार यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची वार्ता सोनांबेसह परिसरातील नागरिकांना कळताच बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली. जिल्हा परिषद सदस्य केरु पवार यांनी सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी टी. एल. बिन्नर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
विहिरीत पडलेला बिबट्या पोहून थकला होता आपले प्राण वाचविण्यासाठी तो वायररोपचा आधार घेत धडपड करीत असल्याचे दिसून आले. विहिरीजवळ बिबट्याला पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केल्याने सिन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, पोलीस कर्मचारी विलास वैष्णव, व्ही. जी. घुईकर, तुषार मरसाळे, प्रशांत बच्छाव यांनी नागरिकांना विहिरीपासून बाजूला हटविले.
वनपरिक्षेत्र अधिकारी बिन्नर यांच्यासह वनरक्षक आर. एम. सोनार, के. आर. इरकर, ए. बी. साळवे, वनपाल ए. के. लोंढे, बाबुराव सदगीर, टी. एल. डावरे यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने लाकडी पाळण्याला चारही बाजूला दोरखंड बांधून विहिरीत सोडले.
वायररोपच्या आधारावर विहिरीत असलेल्या बिबट्याने लाकडी पाळण्यावर उडी घेतली. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी सदर झुला दोरखंडाच्या सहाय्याने वर ओढला. लाकडी पाळणा सुमारे तीन फूट
अंतर वर येणे बाकी असतांना बिबट्याने विहिरीबाहेर उडी मारुन डोंगराच्या दिशेने धूम ठोकली. (वार्ताहर)