आगीतून विहिरीत पडलेल्या बिबट्याची यशस्वी चढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 01:09 AM2022-05-21T01:09:56+5:302022-05-21T01:10:33+5:30
मजुरांना उसाच्या फडात बिबट्या दिसल्यानंतर मजुरांनी उसालाच आग लावून दिली. त्यामुळे बिबट्याने आगीतून बाहेर पडत धाव घेतली खरी परंतु भेदरलेला बिबट्याजवळच असलेल्या विहिरीत जाऊन पडला. आगीतून फुफाट्यात जाऊन पडावा तसा. मात्र, विहिरीत पडलेल्या बिबट्याने जीवनमरणाशी संघर्ष करत दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पडक्या विहिरीतूनही यशस्वी चढाई करत तेथून धूम ठोकली तेव्हा बिबट्याला पाहण्यासाठी आलेल्या बघ्यांची पळता भुई थोडी झाली.
शैलेश कर्पे,
सिन्नर : मजुरांना उसाच्या फडात बिबट्या दिसल्यानंतर मजुरांनी उसालाच आग लावून दिली. त्यामुळे बिबट्याने आगीतून बाहेर पडत धाव घेतली खरी परंतु भेदरलेला बिबट्याजवळच असलेल्या विहिरीत जाऊन पडला. आगीतून फुफाट्यात जाऊन पडावा तसा. मात्र, विहिरीत पडलेल्या बिबट्याने जीवनमरणाशी संघर्ष करत दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पडक्या विहिरीतूनही यशस्वी चढाई करत तेथून धूम ठोकली तेव्हा बिबट्याला पाहण्यासाठी आलेल्या बघ्यांची पळता भुई थोडी झाली. सिन्नर तालुक्यातील फुलेनगर(माळवाडी) येथील परिसरात हा सारा थरार शुक्रवारी (दि.२०) सकाळी नागरिकांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.
सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील फुलेनगर (माळवाडी) शिवारात खंडेराव पठाडे यांच्या शेतातील उसाच्या तोडणीचे काम सुरू होते. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उसाची तोडणी शेवटच्या टप्प्यात असताना उसात दबा धरून बसलेला बिबट्या मजुरांना दिसला. त्यांनी आरडाओरडा करत राहिलेला शिल्लक ऊस पेटवून दिल्यानंतर बिबट्याने ऊसातून धूम ठोकली. मात्र, फुलेनगर-घोटेवाडी रस्त्याला माजी उपसरपंच दत्तात्रय आनप आणि सुरेश आनप यांच्या ६० फूट खोल असलेल्या सामाईक विहिरीत सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पडला. कुत्रे भुंकण्याचा आवाज येत असल्याने आनप आणि माळी कुटुंबीयांना सदर बिबट्या विहिरीत पडताना पाहिला. तथापि, विहिरीत उन्हाळ्यामुळे एका कोपऱ्यात केवळ तळाला गुडघाभर पाणी होते. जोराने पळत आलेला बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्यानंतर त्याने काहीवेळ दम घेतला. या विहिरीला पायऱ्यावजा बाहेर येण्यासाठी जागा आहे. मात्र, विहिरीतून बाहेर पडण्यासाठी त्याने चुकीच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. दरम्यान, विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने विहिरीभोवती परिसरातील शेतकरी व बघ्यांची गर्दी झाली. सिन्नरच्या वनविभागाला विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती देण्यात आली. सुमारे दोन तास बिबट्याचे विहिरीतून बाहेर येण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर बिबट्याने विहिरीतून पुन्हा चढाई सुरू केली आणि क्षणार्धात बिबट्या सरसर वर आला. विहिरीच्या कठड्याभोवती असलेल्या बघ्यांची त्यामुळे पळता भुई थोडी झाली. मात्र कोणालाही इजा न करता बिबट्याने शेजारील भाऊसाहेब पठाडे यांच्या उसाकडे पलायन केले.