इस्राइल पद्धतीने आंब्याची यशस्वी लागवड

By Admin | Published: July 19, 2016 12:31 AM2016-07-19T00:31:19+5:302016-07-19T00:34:54+5:30

सुरगाणा : पडीक जमिनीवर प्रथमच केलेला प्रयोग फलद्रुप

Successful cultivation of mangoes by Israel method | इस्राइल पद्धतीने आंब्याची यशस्वी लागवड

इस्राइल पद्धतीने आंब्याची यशस्वी लागवड

googlenewsNext

सुरगाणा : स्वत:ची पडीक जमीन असेल आणि शेतीविषयक योग्य व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन मिळाले तर पडीक जमिनीचा कसा कायापालट होऊ शकतो हे येथील डॉ. नितीन आहेर यांनी पाच एकर पडीक जमिनीवर इस्राइल तंत्र वापरून आंब्याच्या ४३०० कलमांची लागवड करून दाखवून दिले आहे.
निसर्गाची आवड असलेले येथील डॉ. नितीन सुरेश आहेर यांनी सुरगाणा-बोरगाव रस्त्यालगत पडिक पाच एकर जमीन खरेदी केली होती. एका बाजूने मुख्य रस्ता आणि एका बाजूने आमटी नदी. या उंच सखल पडीक जमिनीवर शेतीविषयी काहीतरी वेगळे करून दाखविण्याचा विचार डॉ. आहेर यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांनी या जमिनीचे सर्व प्रथम सपाटीकरण करून घेतले. आता काय लागवड करावी म्हणजे उत्पन्न मिळेल याबाबत शेतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्याकरिता डॉ. आहेर यांनी येथील कृषी विभागातील अशोक मोहाडीकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडून सल्ला घेतला. मोहाडीकर यांनी सदर जागेवर आंब्याची बाग लावण्याचा सल्ला दिला. तद्नंतर येथील व्यावसायिक विकी (हरीश) आहेर यांच्याकडून हरसूलजवळील चिंचवड येथील जनार्दन वाघेरे व सांगली येथील राजू गेंदा पाटील या शेतकऱ्यांनी यशस्वीरीत्या आंबाची लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डॉ. आहेर यांनी चिंचवड (हरसूल) व सांगली येथे जाऊन इस्रायल तंत्राचा वापर करून आंब्याची केलेली लागवड पाहून संपूर्ण माहिती जाणून
घेतली.
त्यानंतर सुरुवातीला प्रयोग म्हणून शेजारील गुजरात राज्यातील केशर, हापूस व दशहरी या जातीच्या ७०० आंब्याची कलमे आणून एक एकरमध्ये त्यांची लागवड केली. त्यानंतर उर्वरित चार एकरवर ४३०० कलमांची लागवड केली. त्यांची योग्य निगा राखली. ही सर्व कलमे जगली. इस्राइल पद्धतीने लागवड केलेल्या दोन झाडांमधील अंतर तीन फूट, तर लांबीचे अंतर १४ फूट आहे. वाढ होत असलेल्या या झाडांची छाटणी करण्यात आल्याने झाडांची उंची कमी राहणार आहे. फांद्यांचा घेर मात्र थोडक्यात छत्रीप्रमाणे गोलाकार असणार आहे. डॉ. आहेर यांनी दोन गायींची खरेदी केली असून, गायींपासून मिळणारे शेण, गोमूत्र तसेच बेसनपीठ व वडाच्या झाडाखालची माती हे मिश्रण २०० लिटर पाण्यात एकजीव करून तयार झालेले जिवामृत कोणतेही केमिकल न वापरता सेंद्रिय पद्धतीने वापरून सर्व झाडांना जीवदान देऊन तालुक्यात प्रथमच इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून डॉ. नितीन आहेर यांनी आंब्याची बाग फुलवली आहे.
याकामी कृषी विभागाचे अशोक मोहाडीकर, चिंचवड (हरसूल) चे शेतकरी जनार्दन वाघेरे, सांगली येथील शेतकरी राजू पाटील त्याचप्रमाणे येथील आहेर यांचे लहान बंधू युवराज आहेर, डॉ. सुनील कुंमट, मीलन दवंडे, डॉ. तुषार धोंडगे, वसंत गवळी, अमोल भोये व दवंडे परिवार आदिंचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे डॉ. नितीन आहेर यांनी आवर्जून सांगतात. (वार्ताहर)

Web Title: Successful cultivation of mangoes by Israel method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.