दुर्मीळ गिधाडांचे यशस्वी संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:19 AM2019-02-25T00:19:30+5:302019-02-25T00:19:55+5:30
जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणाऱ्या व धोकादायक स्थितीत असलेल्या दुर्मीळ गिधाडांचे संवर्धन नाशिकमध्ये यशस्वीरीत्या केले जात आहेत. लांब चोचीचे व पांढºया पाठीची शेकडो गिधाडे जिल्ह्यातील आदिवासी भागात आढळून येतात.
नाशिक : जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणाऱ्या व धोकादायक स्थितीत असलेल्या दुर्मीळ गिधाडांचे संवर्धन नाशिकमध्ये यशस्वीरीत्या केले जात आहेत. लांब चोचीचे व पांढºया पाठीची शेकडो गिधाडे जिल्ह्यातील आदिवासी भागात आढळून येतात. हरसूलजवळ खोरीपाड्यामधील आदिवासींनी वनविभागाच्या सहकार्याने गिधाडांसाठी ‘भोजनालय’ चालविण्याचा आगळावेगळा उपक्रम मागील आठ वर्षांपासून हाती घेतला आहे. याद्वारे गिधाडांचे यशस्वीपणे संवर्धन केले जात आहे.
निसर्गातील सफाई कामगाराची भूमिका गिधाडे बजावतात. अन्नसाखळीमधील हा पक्षी महत्वाचा दुवा मानला जातो. भारतात एकेकाळी गिधाडांची संख्या चांगली होती; परंतु गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. ती इतकी कमी झाली की आता गिधाडे भारतातून नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतात पाळीव प्राण्यांची संख्या भरपूर असल्याने त्यांचे खाद्य कमीही झालेले नाही. गिधाडांना मुख्य फटका बसला आहे तो डायक्लोफिनॅकसारख्या औषधांचा जनावरांच्या उपचाराकरिता होणाºया अतीवापरामुळेच.
नाशिकपासून अवघ्या ५० किलोमीटरवर त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरसूलजवळ असलेल्या खोरीपाड्याने गिधाडांच्या संवर्धनासाठी मागील सात वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गिधाडे नसतील तर आजूबाजूला टाकले जाणारे जनावरांचे मृतदेह सडून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होईल, म्हणून गिधाडांना वाचवले गेले पाहिजे, असे प्रबोधन वनविभागाकडून करण्यात आले. त्याचे महत्त्व येथील आदिवासींना पटवून देण्यात वनविभागाला यश आले. खोरीपाड्याच्या डोंगराच्या पायथ्याशी नाशिक पश्चिम वनविभागाकडून २०१२ साली गिधाडांसाठी ‘रेस्तरां’ उभारला गेला. येथील मोकळ्या भुखंडाभोवती संरक्षक जाळीचे कुपंण करुन त्या कुंपणामध्ये मृत्यूमुखी पडलेली जनावरे वैद्यकिय तपासणीनंतर टाकण्यास आदिवासींनी सुरूवात केली. पहिल्या दोन वर्षांमध्ये या अनोख्या अशा प्रकल्पाला चांगलेच यश आले. सुमारे पन्नास ते साठ गिधाडे यावेळी येथे भूक भागविण्यासाठी आल्याची पहिली नोंद हरसूलच्या वनधिकाºयांनी केली. हा आकडा आता शेकडोंच्या घरात जाऊन पोहचल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप पाटील यांनी
सांगितले. सुरूवातीला केवळ
लांब चोचीची गिधाडे येथे वास्तव्यास होती; मात्र मागील तीन वर्षांपासून पांढºया पाठीची गिधाडेदेखील येथे आढळून येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’चा विशेष प्रकल्प
नाशिक पश्चिम वनविभागाकडून ‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’ विकसीत करण्याचा प्रस्ताव तयार करुन नागपूर येथे प्रधान वनसंरक्षक कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी हा केंद्रबिंदू ठरविण्यात आला आहे. येथून पुढे चारही दिशांमध्ये १०० किलोमीटरच्या क्षेत्रात गिधाडांचा अधिवास असून खोरीपाडा गिधाड भोजनालयदेखील याअंतर्गत येते. यासंपुर्ण परिसरात बॉम्बे नेचर हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) माध्यमातून सुक्ष्म अभ्यास केला जाणार आहे. हा संपुर्ण परिसर ‘गिधाड सुरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित केला जाणार आहे. यासाठी २६० दिवसांमध्ये सर्वेक्षण पूर्ण करावयाचे असून त्यासाठी सुमारे ९० हजारांचा खर्च प्रस्तावित आहे. एकूण दोन कोटींचा हा प्रकल्प पाच वर्षांत सुमारे सहा टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. वनविभागाला अद्याप दहा लाखांचा निधी मंत्रालयाकडून प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यात ७२ लाखांच्या निधीला मंजुरी दिली गेली आहे. हा प्रकल्प उपग्रह टेलिमेटरीद्वारे राबविला जाणार आहे.
दोन्ही प्रजातींचे वास्तव्य
खोरीपाडा गिधाड भोजनालयामुळे या भागात गिधाडांचे दमदार संवर्धन होण्यास मदत होत आहे. सुरूवातीला या भागात लांब चोचीची गिधाडे आढळून आली. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांमध्ये पांढºया पाठीची गिधाडेदेखील येथे वास्तव्यास आली. दोन्ही प्रजातींच्या गिधाडांचे संवर्धन येथे होताना दिसून येत आहे. गिधाडांची संख्या शेकडोने वाढली आहे. येथील डोंगरांवर तसेच झाडांवर गिधाडांचा अधिवास तयार झाला आहे.