सांस्कृतिक भूक भागविणाऱ्या ‘बाबाज’ला उत्तराधिकाऱ्यांची चणचण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:58+5:302021-09-23T04:16:58+5:30
नाशिकमधून पुढे जाऊन राज्यस्तरावर नाव कमावलेल्या प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञामागे नाशिकच्या बाबाज करंडकने दिलेल्या प्लॅटफॉर्मने अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. ...
नाशिकमधून पुढे जाऊन राज्यस्तरावर नाव कमावलेल्या प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञामागे नाशिकच्या बाबाज करंडकने दिलेल्या प्लॅटफॉर्मने अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच नाशिकच नव्हे तर राज्यभरात आपल्या कार्याचा दबदबा निर्माण करण्यात बाबाज थिएटर यशस्वी ठरले. किंबहुना अशा प्रत्येक कलाकाराच्या पाठीशी ‘बाबाज’ आणि संस्थेचे संस्थापक प्रशांत जुन्नरे हे ठामपणे उभे राहिले. त्यामुळेच त्या कलाकारांना, तंत्रज्ञांना त्यांच्या नाटकांचे, एकांकिकांचे सादरीकरण करणे शक्य झाले. आज त्यातील अनेक कलाकार चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये, सिरीअल्समध्ये लीड रोल करीत दररोज झळकत आहेत. ते झळकत आहेत, हे नाशिककरांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनामुळे सर्व रंगकर्मी आणि नाट्य चळवळ कोलमडून पडण्याच्या बेतात आहेत. त्यात स्थापनेच्या २१ वर्षांनंतर बाबाजचे संस्थापक प्रशांत जुन्नरे यांच्यासारखे ‘रत्नपारखी’ नाइलाजास्तव आता बाबाज संस्थेच्या विसर्जनाची भाषा करू लागल्याने तर हा जगन्नाथाचा रथ पुढे चालणार कसा? अशी चिंता रंगकर्मींच्या मनात निर्माण होणे साहजिकच आहे. मात्र, राज्यस्तरावर झळकणाऱ्यांनी ज्या व्यासपीठाचा उपयोग करून गगनभरारी घेतली, त्यांनी निदान नाशिकच्या रंगभूमीसाठी किंवा नाट्य चळवळीसाठी आपल्या वलयाचा, नावाचा फायदा करून देण्याची आता नितांत गरज निर्माण झाली आहे. किंबहुना जगन्नाथाचा रथ प्रत्यक्ष देवाचा असला तरी त्याला ओढणारे अनेक हात असतात, म्हणूनच तो पुढे चालत राहतो. त्याप्रमाणेच बाबाजचा रथ पुढे चालू राहून नाशिककरांची सांस्कृतिक भूक भागावी, अशी तळमळ असणाऱ्या हातांनी नि:स्वार्थपणे पुढे येऊन त्या रथाला हात लावण्याची गरज आहे. अन्यथा इतर अनेक चांगल्या संस्था, उपक्रमांप्रमाणेच अर्थकारणाचा विचार न केलेली बाबाजसारखी संस्था इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही.
धनंजय रिसोडकर