कोरोनाचा असाही लाभ; प्रत्येक बालकावर धार्मिक संस्कारांना वेळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:17 AM2021-09-23T04:17:24+5:302021-09-23T04:17:24+5:30
नाशिक : कोरोना कालावधीत अनेक तोटे समोर आले असले तरी या काळात बहुतांश पालकांना घरात अधिक काळ थांबण्याची संधी ...
नाशिक : कोरोना कालावधीत अनेक तोटे समोर आले असले तरी या काळात बहुतांश पालकांना घरात अधिक काळ थांबण्याची संधी मिळाल्याने आपल्या बालकांवर आपल्या धर्मातील चांगले संस्कार बिंबवण्यासाठी त्यांना वेळ मिळाला. त्यामुळे हिंदू घरांमध्ये श्लोक, शुभंकरोतीपासून आरत्यांपर्यंत अनेक संस्कार रुजवले गेले. मुस्लीम धर्मीयांकडून नमाजपठणासह कुराणातील आयतांचे वाचन करून घेण्यात आले, तर ख्रिश्चन धर्मीयांनी रविवारची प्रार्थना घरात करतानाच बायबल वाचनाचा संस्कार, तर शीख धर्मीयांनी गुरुग्रंथसाहिबचे पठण, गुरुबाणीतील वचनांचे वाचन करून घेत बालकांवर धार्मिक संस्कार रुजवण्यात योगदान दिले.
कोरोनाकाळात दररोज संध्याकाळच्या वेळी घरीच असल्याने मुलांबरोबर देवासमोर बसून मनाचे श्लोक, शुभंकराेती, रामरक्षा, पसायदान म्हणण्यास वेळ मिळाला. त्यामुळे बालवयातच मुलांवर संस्कार करण्याच्या दृष्टीने त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग करून घेता आला. अन्यथा दैनंदिन धावपळीत अनेक पालकांना घरी यायलाच रात्र होत असल्याने ते शक्य झाले नव्हते.
मुलांवर बालपणीच धार्मिक संस्कार केल्यास त्यांच्या मनात ते रुजतात. कोरोनामुळे सायंकाळी घरात पालक आणि मुले दोघेही असण्याचा मिळालेल्या वेळेचा सदुपयोग बहुतांश पालकांनी केला. त्यामुळे गत वर्षभरात अनेक घरांमध्ये मुले आपापल्या धर्मातील परंपरांचे आचरण करण्यास व्यवस्थितपणे शिकल्याचे दिसून येत आहे.
सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ
---------------------------
कोरोनाकाळात वेळ मिळाल्याने दैनंदिन पठणातील विविध दुवा, पाच कलमे, सुरह तोंडी पाठ करण्यावर भर देण्यात आला. तसेच वजू, गुस्ल आणि नमाजबाबतच्या पद्धती समजावून सांगत चिमुकल्यांना घरातच धार्मिक शिक्षण देण्यात आले. रमजान पर्वावरदेखील कोरोनाचे सावट असल्याने रमजान काळात धार्मिक उपासनेवर अधिक भर देण्यात आला होता.
--------
कोरोनाच्या गत दीड वर्षात शाळांना सुटी असल्याने घरातच मुलांवर धार्मिक संस्कार करण्यासाठी पालकांना वेळ मिळाला. यंदाच्या वर्षीही रमजान कोरोनाकाळात साजरा झाला. त्यामुळे पालकांनी धार्मिक संस्कारमूल्य रुजविण्यावर अधिक लक्ष दिले.
सय्यद एजाझ काझी, नायब काझी ए हैदर
------------
बायबलमधील वचने वाचून त्याचा अर्थ समजावून सांगण्यास कोरोनाकाळात आम्हाला वेळ मिळाला. त्यामुळे एकप्रकारे बायबलच्या वाचनाला चालना मिळाली. मुलांनीदेखील बायबल समजून घेण्यात पुढाकार घेतल्याने आम्हालादेखील आनंद झाला. तसेच त्यामुळे घरातील वातावरणातही सकारात्मक बदल झाला.
---------
कोरोनाकाळात ख्रिस्ती धर्मातील प्रार्थना, दहा आज्ञा, आमचे बापा ही प्रार्थना तसेच धर्मशास्त्र, नीतिशास्त्र तसेच बायबलमधील वचनांची माहितीदेखील आम्ही ऑनलाइन पद्धतीने घरांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे घरात राहूनदेखील बालकांवर मूल्यसंस्कार आणि धार्मिक संस्कार करणे पालकांना शक्य झाले.
वेन्सी डिमेलो, फादर