सर्जा-राजाच्या श्रमाचा असाही सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:45+5:302021-09-12T04:17:45+5:30
वडनेर भैरव (पप्पू वाढवणे) : शेतात राब राब कष्ट करणाऱ्या सर्जा-राजाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव ...
वडनेर भैरव (पप्पू वाढवणे) : शेतात राब राब कष्ट करणाऱ्या सर्जा-राजाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील शेतकऱ्याने आपल्या घरासमोरच बैलांची फायबरची प्रतिकृती तयार करत त्यांच्या श्रमाचा केलेला आगळावेगळा सन्मान परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
ग्रामीण भागात आजही बैलांप्रती मोठी श्रद्धा ठेवून त्यांना सन्मानाने वागणूक दिली जाते. त्यांच्या निवाऱ्याबरोबरच खाण्याकडेही विशेष लक्ष दिले जाते. वेळोवेळी त्यांच्यावर औषधोपचारही करत त्यांची काळजी घेणारे शेतकरीही मोठ्या प्रमाणात आहेत. वडनेर भैरव येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब परशुराम मोहिते यांच्या गोठ्यात कधी काळी १५ ते २० बैलजोड्या होत्या. परंतु कालोघात शेतीचा वाढलेला व्याप, यंत्र शेतीचे युग यामुळे बैलांची संख्या कमी होत गेली. मोहिते द्राक्ष शेतीकडे वळल्याने आणि बैलांकडे लक्ष देण्यास सवड मिळत नसल्याने त्यांनी हळूहळू आपल्याकडील बैलांची संख्या कमी केली. परंतु बाळासाहेब यांचे चिरंजीव नंदकुमार मोहिते या तरुण शेतकऱ्याने आजवर कृषी वैभव मिळवून दिलेल्या सर्जा-राजा यांच्या प्रतीचे ऋण म्हणून आपल्या बंगल्यासमोर ७५ हजार रुपये खर्चून फायबरमध्ये आकर्षक प्रतिकृती तयार केली. पोळ्याच्या दिवशी या प्रतिकृतीचे विधिवत पूजन केले. मोहिते कुटुंबीयांनी बैलाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. (११ वडनेर)
110921\11nsk_14_11092021_13.jpg
११ वडनेर