बसखाली चिरडून बालक ठार

By Admin | Updated: October 8, 2015 00:07 IST2015-10-08T00:04:12+5:302015-10-08T00:07:40+5:30

पंचवटी येथील घटना : संतप्त नागरिकांनी बस फोडली; रास्ता रोको आंदोलन; पोलिसांचा लाठीमार

Suck down the child and kill the child | बसखाली चिरडून बालक ठार

बसखाली चिरडून बालक ठार

पंचवटी : शाळेतून नातवंडांना घराकडे पायी घेऊन जाणाऱ्या आजी व दोघा नातवांना शहर बसने धडक दिल्याने बसच्या चाकाखाली सापडून गणेशवाडीतील रोनित अश्विन चौहान या अडीच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दुपारी सव्वा बारा वाजता सेवाकुंज येथील संकटमोचन हनुमान मंदिरासमोर हा अपघात घडला. अपघातात जखमी झालेल्या संगीता नंदकुमार चौहान (५०) या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, अपघातानंतर संतप्त जमावाने रास्ता रोको केले.
गणेशवाडी परिसरात राहणाऱ्या अश्विन चौहान यांचा अडीच वर्षाचा मुलगा रोनित व मुलगी जीविका चौहान असे दोघे पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या हरिबाई देसाई मॉँटेसरी शाळेत शिक्षण घेत आहेत. बुधवारी शाळा सुटल्यानंतर त्यांची आजी संगीता चौहान या दोघांनाही शाळेतून घेऊन घराकडे येत असताना सेवाकुंजजवळ निमाणी बसस्थानकाकडून पंचवटी आगारकडे भरघाव जाणाऱ्या बसने (एम. एच. १२ इएफ ६०९०) त्यांना जबर धडक दिली. यात रोनित हा मागच्या चाकाखाली चिरडला गेला तर आजी बसखाली अडकल्या. जीविका ही सुदैवाने बाजूला फेकली गेल्याने बचावली. बसच्या चाकाखाली सापडल्याने रोनित व आजी या दोघांनाही तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र तेथे उपचार सुरू असताना रोनितचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याची वार्ता पसरताच शेकडोंच्या जमावाने नागरिक रस्त्यावर जमा झाले आणि त्यांनी रास्ता रोको करून बसच्या काचा फोडून वाहतूक पोलीस शाखेचा निषेध नोंदविला. परिस्थिती हाताबाहेर असल्याने पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, उपआयुक्त एन. अंबिका आदिंसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
नागरिकांनी रास्ता रोको केल्याने सुमारे दोन तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. (वार्ताहर)

Web Title: Suck down the child and kill the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.