मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बदल, अचानक ब्रम्हांडपंडितांची भेट अन् ईशान्येश्वराचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:55 PM2022-11-24T12:55:14+5:302022-11-24T13:00:03+5:30
ज्योतिषाची भेट घेतल्याची चर्चा : ‘अंनिस’ने घेतला आक्षेप
सिन्नर (नाशिक) : राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. २३) मुख्यमंत्री शिर्डी दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांनी आपल्या नियोजित दौऱ्यात अचानक बदल कशिर्डीला साईबाबांचे दर्शन घेतले आणि मुंबईकडे रवाना होताना अचानक त्यांचा ताफा सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारातील ईशान्येश्वर मंदिराकडे वळाला. याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ईशान्येश्वराचे दर्शन घेतले व पूजा केली. मंदिराचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रख्यात ज्योतिषी असल्याने मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाची भेट घेतल्याची चर्चा पसरली. त्यानंतर महाराष्ट्र ‘अंनिस’ने मुख्यमंत्र्यांच्या या कथित भविष्य जाणून घेण्याच्या कृतीवर टीकेची झोड उठवली.
रत मिरगावच्या मंदिराला भेट दिली व दर्शन घेत पूजाविधी केला. मुख्यमंत्र्यांच्या या अचानक बदललेल्या दौऱ्यामुळे पोलिस यंत्रणेची एकच तारांबळ उडाली. त्यांच्या समवेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते. श्री शिवनिका संस्थानचे अध्यक्ष कॅप्टन अशोककुमार खरात, उपाध्यक्ष राजेंद्र घुमरे, सरचिटणीस नामकर्ण आवारे, विश्वस्त नितीन गांगुर्डे, डॉ. निरंजन निर्मळ, अरविंद बावके, रमेश हिंगे, दीपक लोंढे यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, ईशान्येश्वर मंदिराची उभारणी करणारे कॅप्टन अशोककुमार खरात हे परिसरात ब्रह्मांडपंडित म्हणून परिचित असून त्यांना अंकशास्त्राचे ज्ञान असल्याचे सांगितले जाते. त्यांचे नाशिकला कार्यालय आहे व शिंदे यांच्याकडे नेहमी येणे-जाणेही असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र ‘अंनिस’ने सोडले टीकास्त्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव शिवारातील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली असली तरी ते तेथील ज्योतिषाकडे भविष्य जाणून घेण्यासाठी गेले असल्याचे समजते आहे. तसे असल्यास ही अत्यंत बेजबाबदार कृती असल्याची टीका महाराष्ट्र ‘अंनिस’चे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे. चांदगुडे यांनी याबाबत म्हटले आहे, पुरोगामी महाराष्ट्रात संवैधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध महाराष्ट्र अंनिस करत आहे. ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे. कुणी ते शास्त्र असल्याचे सिद्ध केल्यास आम्ही एकवीस लाखांचे बक्षीस ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वर्तनातून चुकीचा संदेश गेला असल्याचेही चांदगुडे यांनी म्हटले आहे.