शिंदे गाव येथील भांगरे मळ्यात ट्रकला अचानक आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:15 AM2019-01-29T01:15:13+5:302019-01-29T01:15:37+5:30
शिंदे गाव येथील भांगरे मळ्यात घरासमोर उभ्या केलेल्या आयशर ट्रकला रात्री अचानक आग लागल्याने त्या आगीत संपूर्ण ट्रक व त्यामधील पीयुसी पाईप जळून खाक झाले.
नाशिकरोड : शिंदे गाव येथील भांगरे मळ्यात घरासमोर उभ्या केलेल्या आयशर ट्रकला रात्री अचानक आग लागल्याने त्या आगीत संपूर्ण ट्रक व त्यामधील पीयुसी पाईप जळून खाक झाले.
विजय मनोहर नारखेडे यांनी शुक्रवारी (दि. २५) रात्री ८.३० वाजता सातपूर येथील ईपीसी पाईप कंपनीतून आयशर ट्रक (एमएच १५ ईजी ९४७३) हिच्यामध्ये पीयुसी पाईप भरून ट्रक नेहमीप्रमाणे घरासमोर लावली होती. नारखेडे यांना दुसऱ्या दिवशी पीयुसी पाईपची डिलेव्हरी द्यायची होती. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास अचानक कशाने तरी आयशर ट्रकला आग लागली. काही मिनिटातच आगीच्या ज्वालांनी ट्रकला चहुबाजूने घेरले. नारखेडे व आजूबाजूच्या रहिवाशांना ट्रकला आग लागल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी बादल्यांमधून पाणी भरून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
नाशिकरोड अग्निशामक दलाचे बंब देखील लागलीच घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आयशर ट्रकला लागलेली आग विझवली. मात्र तोपर्यंत आयशर ट्रक व त्यामधील पीयुसी पाईप जळुन खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात जळीताची नोंद करण्यात आली आहे. चालक विजय नारखेडे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून आयशर ट्रकवरच संसाराचा उदरनिर्वाह चालत होता. महिन्याभरापूर्वीच मुलीचे लग्न झाले आहे. आगीत ट्रक जळुन खाक झाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.