केंद्रीय पथकाची नाशिक शहरात अचानक पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:15 AM2020-12-22T04:15:26+5:302020-12-22T04:15:26+5:30
केंद्र शासनाने स्वच्छ शहर सर्वेक्षणात अनेक प्रकारचे बदल केले आहेत. त्यानुसार महापालिकेने हागणदारीमुक्त शहर आणि वॉटर प्लससाठी प्रस्ताव सादर ...
केंद्र शासनाने स्वच्छ शहर सर्वेक्षणात अनेक प्रकारचे बदल केले आहेत. त्यानुसार महापालिकेने हागणदारीमुक्त शहर आणि वॉटर प्लससाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी तीन दिवसांपूर्वी पथक नाशिक शहरात अचानक दाखल झाले. पहाटे आणि रात्री देखील शहराच्या विविध भागात अचानक पाहणीसाठी पथकाचे कर्मचारी जाऊ लागल्याने मनपाच्या आरोग्य पथकाची धावपळ उडाली. या पथकाने विविध भागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या तसेच त्यांचा प्रतिसाद कसा आहे, या सर्व बाबींची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे नदीकाठी आणि अन्य भागातही तपासणी करण्यात आली.
आता वाॅटर प्लस अंतर्गत शहरातील विविध भागातील पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी देखील अशाच प्रकारे अचानक पथक दाखल होणार आहे. त्यामुळे महापालिका सतर्क झाली आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर योजनेची तयारी पूर्ण झाली असून नाशिक शहरात आता घरगुती कचऱ्याची घरच्या घरीच विल्हेवाट लावण्याबरोबरच घनकचऱ्याचे नावीन्यपूर्ण प्रकल्प शोधण्यात येत असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितली.
कोट...
स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी महापालिकेची तयारी सुरू असून हॉटेल किंवा मोठ्या व्यावसायिकांकडून देखील कंपोस्ट खत तयार करण्यास प्रतिसाद मिळत आहे. सुमारेे साठ ते सत्तर ठिकाणी अशाप्रकारचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका