शिवभोजन केंद्रास मुख्यमंत्र्यांची अचानक भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 07:03 PM2020-02-16T19:03:49+5:302020-02-16T19:04:46+5:30
दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यासाठी आले असता, त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेल्या शिवभोजन उपक्रमास भेट देतील, अशी अटकळ बांधण्यात आली होती
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी वेळात वेळ काढून वडाळा नाका रस्त्यावरील द्वारकामाई बचत गटाच्या शिवभोजन केंद्रास भेट देऊन तेथील व्यवस्था व लाभेच्छुकांच्या चेहºयावर स्वस्त दरात भोजन मिळत असल्याचे भाव पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी स्वत: ठाकरे यांनी भोजन घेत असलेल्यांशी संपर्क साधून आस्थेने विचारपूस केली. त्याच प्रमाणे केंद्र चालकांना देखील खाद्य पदार्थांचा दर्जा राखण्याच्या सूचना केल्या.
दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यासाठी आले असता, त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेल्या शिवभोजन उपक्रमास भेट देतील, अशी अटकळ बांधण्यात आली होती व तशी तयारीही करण्यात आली होती. परंतु बैठकीच्या व्यस्ततेमुळे ठाकरे भेट देऊ शकले नव्हते. रविवारी मात्र राज्यस्तरीय वकील परिषदेच्या निमित्ताने मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाशकात आगमन झाले त्यावेळी त्यांनी कार्यक्रमातून वेळात वेळ काढून वडाळा नाका रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या द्वारकामाई शिवभोजन उपाहारगृहास दुपारी बारा वाजता भेट दिली. खुद्द मुख्यमंत्री येणार असल्यामुळे पोलिसांनी उपाहारगृहाला गराडा घातला होता. तर शिवभोजन थाळी खाण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट उपाहारगृहात जाऊन भोजन घेत असलेल्या लाभार्थ्यांना जेवणाच्या दर्जाबाबत विचारणा केली त्यावेळी सर्वांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर बचत गटाच्या अध्यक्षा अलका चहाळे, मंगला चहाळे यांच्याशीही संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार पंकज पवार आदी उपस्थित होते.