अॅँटिजेन टेस्ट अचानक कमी करण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:29 AM2020-09-09T01:29:48+5:302020-09-09T01:30:31+5:30
शहरात कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात चाचण्या घेऊन साखळी तोडल्याचे सांगण्यात येत असले तरी आता मात्र, प्रशासनाने या चाचण्या मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला असून, अनेक भागातील चाचण्यांचे काम मंगळवारी (दि. ८) थांबविण्यात आले आहे. आयसीएमआरच्या निर्णयानुसारच प्रशासनाने अशी भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.
नाशिक : शहरात कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात चाचण्या घेऊन साखळी तोडल्याचे सांगण्यात येत असले तरी आता मात्र, प्रशासनाने या चाचण्या मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला असून, अनेक भागातील चाचण्यांचे काम मंगळवारी (दि. ८) थांबविण्यात आले आहे. आयसीएमआरच्या निर्णयानुसारच प्रशासनाने अशी भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. तथापि, एकीकडे बाधितांची संख्या वाढत असतानादेखील त्याच्या नियंत्रणासाठी ते आवश्यक असल्याचे सांगून समर्थन करणाऱ्या प्रशासनाने आता मात्र अचानक भूमिका बदलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात ६ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर जून अखेरपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित होती. मात्र, नंतर जुलै महिन्यात रुग्णांची संख्या वाढ होऊ लागली. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अशावेळी महापालिकेने चाचण्या तर वाढविल्याच; परंतु भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून मिशन झिरो नाशिकला सुरुवात केली होती. त्यासाठी संघटनेने २२ रुग्णवाहिकादेखील उपलब्ध करून दिल्या होत्या. सुरुवातीला शहरातील दाट वस्तीत आणि अन्यत्र कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम राबविण्याचे ठरवण्यात आले होते. चाचण्या वाढल्याने बाधितांची संख्या वाढत असली तरी त्यामुळे लवकर रुग्ण शोधून त्याच्यावर तातडीने उपचार केले जात असल्याने सुप्तावस्थेतील अशा रुग्णांमुळे अन्य नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणारा संसर्ग टाळण्यात येत असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत होते. त्यामुळे शहरात बाधितांची संख्या वाढत गेली आणि एकेका दिवसात पाचशे ते सातशे रुग्ण आढळत आहेत. असे असताना आता मात्र प्रशासनाने या चाचण्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दाट लोकवस्तीमध्ये करणार चाचण्या
आयसीएमआरच्या ३ सप्टेंबरच्या आदेशाप्रमाणे, आता कार्यवाही करण्यात येणार असून, त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण आढळेल, त्या ठिकाणी दाट वस्ती असेल तर तेथे चाचण्या केल्या जातील. बाधित रुग्णाच्या कुटुंबातील, जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींचीदेखील तपासणी करण्यात येईल. त्यातील लक्षणे नसणाऱ्यांना घरीच क्वॉरण्टाइन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे मनपाच्या सर्व फीव्हर क्लिनिकमध्येदेखील चाचण्या करण्यात येणार आहेत.
दोन ते तीन दिवसात शहराच्या बहुतांशी भागात चाचण्या बंद करण्यात आल्या असून, अनेक भागातील नागरिकांना माघारी फिरावे लागले. आता आयसीएमआरच्या नियमानुसार फक्त दाट वस्तीत आणि जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींच्याच चाचण्या करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी सांगितले. तथापि, अशाप्रकारे टेस्ट कमी झाल्यास नागरिकांना मात्र आता खासगी लॅबचा आधार घ्यावा लागणार असून, त्यामुळे वाढीव भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे.