सुळे कालवा सात वर्षांपासून कोरडा!
By admin | Published: February 16, 2017 10:40 PM2017-02-16T22:40:59+5:302017-02-16T22:41:13+5:30
पिळकोस : आवर्तन नसल्याने शेतकऱ्यांत संताप
पिळकोस : कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा कालव्याला रब्बीसाठी आवर्तन मिळावे यासाठी पिळकोस, विसापूर, चाचेर, धनगरपाडा, खामखेडा या परिसरातील शेतकरी बांधवांनी संबंधित कळवण पाटबंधारे विभागाला पाणी मागणी अर्ज भरूनदेखील सुळे डाव्या कालव्याला रब्बीसाठी सात वर्षांपासून आवर्तन सोडले जात नसल्याने पिळकोस, खामखेडा व परिसरातील शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरातील विहिरींची पातळीही खोल गेली असून, या परिसरातील बहुतेक विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. सुळे डाव्या कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील पिकांना शेवटचे पाणी देण्याची गरज असताना परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने कालव्याला आवर्तन मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित विभागाच्या नियमानुसार मोठ्या प्रमाणात पाणी मागणी अर्ज भरले असूनही, पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला जात आहे.
पिकांना पाण्याची गरज असताना विहिरींची पातळी खोल गेली असताना, सुळे डाव्या कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी एकत्र येत रब्बीचे पहिले आवर्तन हे तत्काळ मिळावे यासाठीचे सातबारे जोडून पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाला देऊनही संबंधित विभागाकडून कारण देऊन वेळ निभावून नेली जात असून, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा कालव्याच्या साफसफाईचे कारण दिले. नंतर कालव्याचा भराव भरावा लागणार असल्याचे कारण पुढे केले; मात्र आता कालव्याची साफसफाई झाली आहे. कालव्याचे फुटलेले सर्व भरावही बुजविण्यात आलेले आहे तरीदेखील कालव्याला पाणी सोडले जात नसून, पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ही बाब गांभीर्याने घेत कालव्याला पाणी सोडावे व परिसरातील गावातील लहान मोठी धरणे, नाले भरून मिळावे, अशी मागणी या परिसरातील साहेबराव जाधव, शांताराम जाधव, सुरेश जाधव, अभिमन जाधव, दादाजी जाधव, श्रीधर वाघ, निवृत्ती जाधव, मुरलीधर वाघ, केवळ वाघ, प्रभाकर जाधव, सचिन वाघ, ललित वाघ, हंसराज वाघ, सयाजी जाधव, उत्तम मोरे, मार्कंड जाधव, बुधा जाधव, रवींद्र वाघ, सुनील जाधव, राहुल अहेर, यांसह परिसरातील पाटक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. (वार्ताहर)