ब्यूटि पार्लरच्या सेवेलाही फटका
By Admin | Published: July 10, 2017 12:37 AM2017-07-10T00:37:00+5:302017-07-10T00:37:15+5:30
नाशिक : केंद्र सरकारने एक करप्रणाली लागू केल्यामुळे काही वस्तू व सेवा स्वस्त होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केंद्र सरकारने एक करप्रणाली लागू केल्यामुळे काही वस्तू व सेवा स्वस्त होणार आहेत, तर काही महाग होणार आहेत. यात महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ब्यूटि पार्लरला महागाईचा फटका बसणार आहे.
सौंदर्य प्रसाधने, सौंदर्य सेवा यांच्यावर २८ टक्के जीएसटी लागू झाला असल्याने या वस्तू आणि सेवा महागणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. जीएसटीमुळे दरवाढीचे संकेत असले तरी अद्याप जुना स्टॉक क्लिअरन्स करण्याचे काम चालले असून, मुख्य कंपन्यांकडून नवीन दर, नवीन बिलिंग पद्धत याबाबत कोणतीही स्पष्ट सूचना न आल्याने जुने दर, जुनी पद्धत चालू ठेवायची की जीएसटीनुसार सेवा द्यायची, याबाबत संभ्रमावस्था असल्याचे दिसून आले. येत्या आठ ते पंधरा दिवसांत मूळ कंपन्या, ब्यूटि पार्लर संघटना काय निर्णय घेतात, त्यानुसार चित्र स्पष्ट होइल, असे दिसते.दरम्यान, १ जुलैपासून आॅर्डर दिलेली सौंदर्य प्रसाधने, साहित्य यांचा पुरवठाही अद्याप झालेला नसल्याने व्यावसायिक, विक्रेते आणि ग्राहक अशा साऱ्यांनाच त्याचा फटका बसत आहे.
मोठ्या व ब्रॅँडेड कंपन्या सौंदर्य प्रसाधनांवर पूर्वी छोट्या-मोठ्या फ्री गिफ्ट्स वा अन्य सवलतीही देऊ करत होत्या. आता फ्री गिफ्टवरही जीएसटी बसणार असल्याने त्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वाटते. यामुळे सौंदर्य प्रसाधनांची खरेदी, लहान- मोठ्या पार्लरमध्ये जाऊन सौंदर्योपचार घेण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.