सुळे डाव्या कालव्यावरील मोऱ्यांचे काम निकृष्ट
By admin | Published: December 22, 2014 11:20 PM2014-12-22T23:20:14+5:302014-12-23T00:16:35+5:30
नियमांचे उल्लंघन : कामाची चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी
पिळकोस : कडवा धरण उपविभाग अंतर्गत सुळे डाव्या कालव्यावर चाचेर पिळकोस शिवारात सुरू असलेले मोऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, याची संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पांढरीपाडा रस्त्याच्या जवळ, आसोले डोंगराच्या पायथ्याला मोऱ्या टाकण्याचे काम सुरू असून, टी . एन. टी. कन्स्ट्रक्शन, नाशिक यांना हे काम दिलेले आहे. सदर बांधकामात मोठ्या प्रमाणावर दगड-माती मुरूम गोट्यांचा वापर करण्यात येत असून, कामात सीमेंटचाही अभाव दिसून येत आहे. या प्रकरणी शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली असून, संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
कडवा धरण उपविभागाअंतर्गत सुळे डाव्या कालव्याचे ३७ कि.मी. पर्यंत काम झाले असून, खामखेडा गावाच्या पुढील काम प्रलंबित
आहे. चाचेर गावाच्या पांढरीपाडा रस्त्याच्या पूर्वेला शिवारातील डोंगराचे पाणी वाहत येऊन कालव्यात टाकण्यासाठी मोऱ्या टाकण्यात येत आहे. हे काम करत असताना, संबंधित ठेकेदाराकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
कडवा धरण उपविभागाच्या अभियंत्यांचे सदर कामावर नियंत्रण असताना, संबंधित विभागाच्या एकाही अधिकाऱ्याकडून या कामावर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून दगड-गोट्यांचा वापर करुन निकृष्ठ काम केले जात आहे. काम सुरू असताना येथे संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असताना, अधिकारी तर सोडा, पण कर्मचारीदेखील फिरकला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत आमदार जे. पी. गावित यांच्याकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्र ार करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सुळे डाव्या कालव्यास गळती लागून शेतकऱ्यांचे नुकसान होत
असून, कालव्यास दीडशे फूट कॉँक्रिटीकरण प्रस्तावित असून, हे कामही सदर ठेकेदारास दिले आहे. सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात येऊन चांगले काम करणाऱ्या ठेकेदारांनाच कामे दिली जावीत व सदर काम करणाऱ्या ठेकेदाराचे बिल अदा केले जाऊ नये, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. (वार्ताहर)