सुफी धर्मगुरू जरीफ बाबांचा दफनविधी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 01:31 AM2022-07-18T01:31:30+5:302022-07-18T01:32:56+5:30

मूळ अफगाणिस्तानचे रहिवासी असलेले मुस्लीम धर्मगुरू ‘रेफ्युजी’ जरीफ अहमद सय्यद चिश्ती (२८, मिरगाव, सिन्नर) यांचा वीस दिवसांपूर्वी नाशिकच्या येवला तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. जरीफ बाबा यांचे कुटुंबीय अफगाणिस्तानातून भारतात दाखल होणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना दुतावास कार्यालयाने दिली होती; मात्र त्यानंतर व्हिसा मिळण्यास संंबंधितांना विलंब होत असल्याचे सांगण्यात आल्याने दफनविधी लांबणीवर पडला आहे.

Sufi priest Zarif Baba's burial delayed | सुफी धर्मगुरू जरीफ बाबांचा दफनविधी लांबणीवर

सुफी धर्मगुरू जरीफ बाबांचा दफनविधी लांबणीवर

Next
ठळक मुद्देपोलिसांकडून हालचाली गतिमान  अफगाणिस्तानातील कुटुंबियांना व्हिसासाठी अडचणी

नाशिक : मूळ अफगाणिस्तानचे रहिवासी असलेले मुस्लीम धर्मगुरू ‘रेफ्युजी’ जरीफ अहमद सय्यद चिश्ती (२८, मिरगाव, सिन्नर) यांचा वीस दिवसांपूर्वी नाशिकच्या येवला तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. जरीफ बाबा यांचे कुटुंबीय अफगाणिस्तानातून भारतात दाखल होणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना दुतावास कार्यालयाने दिली होती; मात्र त्यानंतर व्हिसा मिळण्यास संंबंधितांना विलंब होत असल्याचे सांगण्यात आल्याने दफनविधी लांबणीवर पडला आहे.

जरीफ चिश्ती बाबा व त्यांचे काही सेवेकरी हे ५ जुलै रोजी येवल्यात गेले होते. तेथे काही भक्तांनी त्यांना औद्योगिक वसाहतीत भूखंडाच्या भूमिपूजनाकरिता जायचे आहे, असा बनाव केला. तेथेच जरीफ बाबा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यानंतर हल्लेखोर फरार झाले. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत येवला पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासचक्रे फिरविण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण पोलिसांना बाबांच्या खुनाचा कट रचून तो तडीस नेणाऱ्या चौघा संशयितांना बेड्या ठोकण्यात यश आले. या गुन्ह्यातील दोन संशयित अद्याप फरार आहेत. यामध्ये ज्याने बाबांवर गोळी झाडली, त्या शुटरचाही समावेश आहे. बाबांचा मृत्यू होऊन जवळपास तीन आठवडे पूर्ण होणार असून, त्यांच्या मृतदेहाचा अखेरचा प्रवास सुखकर करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. दरम्यान, बाबांची पत्नी तरीना जरीफ यांनीही त्यांच्या बहिणीसह पाटील यांची भेट घेऊन मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केल्याचे समजते. तसेच अफगाणिस्तानात परतण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

--इन्फो--

परराज्यातील भक्तांसोबत पोलिसांशी चर्चा

अफगाणिस्तानातून जरीफ बाबा यांचे वडील व काही कुटुंबीय भारतात येणार असल्याचे दुतावास कार्यालयाकडून सांगितले जात होते. मात्र, आता त्यांना व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. भारतातील त्यांच्या भक्तांसोबत ग्रामीण पोलिसांची चर्चा सुरू आहे. आंध्र पद्रेश, कर्नाटकमधील काही भक्तांसोबत प्राथमिक चर्चा पोलिसांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. येवल्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे याबाबत प्रयत्नशील आहेत. येत्या काही दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

--इन्फो--

आमदार शेलारांचे महासंचालकांना पत्र

निर्वासित नागरिक जरीफ बाबा यांच्याकडे इतकी मालमत्ता कोठून व कशी आली, त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देणारे कोण आहेत? याच्या चौकशीसाठी विशेष तपासणी पथक नेमण्याची मागणी आमदार आशिष शेलार यांनी महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. त्यांनी पत्रातून विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.

 

Web Title: Sufi priest Zarif Baba's burial delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.