दिवाळी सुरू होऊनही साखर गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:32 AM2017-10-18T00:32:31+5:302017-10-18T00:32:37+5:30
दरवर्षी सणासुदीला शासनाकडून गोरगरिबांना गोडधोड करून खाण्यासाठी माणशी दिली जाणारी रेशनवरील अतिरिक्त साखर बंद करून केंद्र व राज्य सरकारने तोंड कडू केलेले असताना, आता वाहतूक ठेकेदाराने चालू महिन्याची साखर रेशन दुकानांपर्यंत न पोहोचविल्याने ऐन दिवाळीत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना खुल्या बाजारातून चढ्या भावात साखर खरेदी करावी लागत आहे.
नाशिक : दरवर्षी सणासुदीला शासनाकडून गोरगरिबांना गोडधोड करून खाण्यासाठी माणशी दिली जाणारी रेशनवरील अतिरिक्त साखर बंद करून केंद्र व राज्य सरकारने तोंड कडू केलेले असताना, आता वाहतूक ठेकेदाराने चालू महिन्याची साखर रेशन दुकानांपर्यंत न पोहोचविल्याने ऐन दिवाळीत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना खुल्या बाजारातून चढ्या भावात साखर खरेदी करावी लागत आहे. सणासुदीतच साखर मिळणार नसेल तर नंतर उपयोग काय, असा सवाल करून रेशनच्या साखरेचा काळाबाजार होण्याची शंकाही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. सरकारने रेशनवरील धान्य
व साखरेची थेट दुकानापर्यंत वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली असून, ठेकेदाराने जर साखर पुरविलीच नाही तर दुकानदार कोठून विकणार, असा सवाल दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. केंद्र सरकारने दारिद्र्य-रेषेखालील व अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना दरमहा रेशनवरून स्वस्त दरात साखर देण्यासाठी दिले जाणारे अनुदान राज्य सरकारला देणे बंद केल्यामुळे राज्य सरकारने सध्या फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थींनाच प्रतिकार्ड एक किलो साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने आॅगस्ट महिन्यातच सप्टेंबर ते नोव्हेंबर अशा तीन महिन्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील लाभार्थींसाठी लागणाºया साखरेचा कोटा मंजूर केला आहे. नाशिक जिल्ह्यात अंत्योदय योजनेच्या एक लाख ७९ हजार ४०८ शिधापत्रिका असून, त्यासाठी शासनाने ५३९२ मेट्रिक टन साखर मंजूर करून जिल्ह्याच्या ताब्यात दिली. सदरची साखर त्या-त्या तालुक्यातील शिधापत्रिकेच्या संख्येच्या प्रमाणात तालुक्यांच्या शासकीय गुदामात रवाना झाल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयाचे म्हणणे आहे.