उत्पन्नवाढीसाठी सूचना कमी, मागण्यांचा वर्षाव
By admin | Published: May 30, 2017 12:47 AM2017-05-30T00:47:20+5:302017-05-30T00:47:31+5:30
नाशिक : महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीने महासभेला सादर केले
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीने महासभेला सादर केले. यावेळी, ज्येष्ठांसह नवख्या सदस्यांनी उत्पन्नवाढीसाठी सूचना कमी, मात्र मागण्यांचा पाऊस पाडला. प्रभाग मोठे झाल्याने प्रत्येक नगरसेवकाला एक कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणीही केली. स्थायी समितीने ४० लाखांची तरतूद केली होती. त्यात महासभेने ३५ लाखांची भर घालत नगरसेवकांसाठी ७५ लाखाचा निधी देण्याची घोषणा केली. त्यामुळे प्रशासनाला ३१ प्रभागांकरिता ९३ कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे लागणार असून, आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागून असणार आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत सुमारे ४० सदस्यांनी विविध सूचना केल्या. माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी अंदाजपत्रकात प्रशासनाकडून झालेल्या विविध चुकांची जंत्री सादर केली. आयुक्तांची मंजुरी न घेता अनेक प्रकारचा विधी इतरत्र वर्ग करण्यात आला आहे. काही निधी हा अंदाजपत्रकातील तरतुदींपेक्षाही खर्च झाल्याचेही त्यांनी सांगितले. मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी शासनाकडून जीएसटी अंतर्गत ८ टक्के वाढ धरून मिळणारे अनुदान अपुरे असल्याचे सांगत शासनदरबारी १८ ते २० टक्के वाढ गृहीत धरून मागणी करण्याची सूचना केली. साधुग्रामच्या जागेचा वापर उत्पन्नवाढीसाठी करण्यात यावा. त्याठिकाणी कोल्ड स्टोरेज, लग्नसमारंभाकरिता लॉन्स उभारणी होऊन उत्पन्नात भर पडू शकेल, असेही त्यांनी सांगितले. पश्चिम प्रभागच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी सदर अंदाजपत्रक हे बीओटीने भरलेले असल्याचे सांगत मोफत अंत्यसंस्काराच्या उपयुक्तते बद्दलही प्रश्नचिन्ह उभे केले. राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांसह सर्व नगरसेवकांना संगणक प्रशिक्षण देण्याची सूचना केली. तसेच भद्रकाली टॅक्सी स्टॅँड, बंद पडलेली जळकावाडा शाळेची इमारत याठिकाणी बीओटीवर मार्केट विकसित करण्याची मागणी केली.
कॉँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी सांगितले, पाणीपुरवठ्याची वितरण व्यवस्था संगणकीकृत झाली पाहिजे. स्मशानभूमींची दुरवस्था, काजीची गढी येथे संरक्षक भिंतीची उभारणी, नेहरू व शिवाजी उद्यानातील वाढते अतिक्रमण या मुद्द्यांनाही खैरे यांनी हात घातला. शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगतानाच खेड्यांच्या विकासासाठी विशेष तरतूद करण्याची सूचना केली. भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी नगरसेवकांच्या निधीत वाढ करण्याची सूचना केली. याशिवाय, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांचे प्राकलन तयार करण्याची मागणी केली.
विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी अंदाजपत्रकातील त्रुटींबद्दल प्रशासनाला जाब विचारला. महिला बाल कल्याण विभागाचा निधी समितीची मान्यता घेऊनच वापरण्यात यावा. जीएसटीची ८ टक्के वाढ पुरेशी नाही त्याऐवजी १४ टक्के वाढीचा प्रस्ताव शासनाला पाठवावा. भूसंपादनांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. पाणीचोरी व गळती थांबविण्याची सूचनाही त्यांनी केली.
सभागृहनेता दिनकर पाटील यांनी अंदाजपत्रकातील त्रुटी दुरुस्त केल्या जातील, असे सांगत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास, नदी संवर्धन उपक्रमात नासर्डी, वाघाडी, वालदेवीचाही समावेश आदी मुद्द्यांचा ऊहापोह केला. यावेळी संगीता जाधव, हर्षा बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, पूनम मोगरे, सरोज अहिरे, दीक्षा
लोंढे, सत्यभामा गाडेकर, प्रशांत दिवे, दिनकर आढाव, नयन गांगुर्डे, उद्धव निमसे, प्रतिभा पवार, रुपाली निकुळे, जगदीश पाटील, दिलीप दातीर, चंद्रकांत खाडे, राहुल दिवे, भागवत आरोटे, श्रीमती निगळ, वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर, धिवरे यांनीही विविध सूचना केल्या. उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांवरून वादस्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र छापल्याने शिवसेनेचे सदस्य भडकले. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी छायाचित्रांचा प्रोटोकॉल कुणी ठरविला, असा सवाल करत दुरुस्ती करण्याची मागणी केली. तर मनसेचे अशोक मुर्तडक व सलीम शेख यांनीही पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे छायाचित्र मागे व छोटे छापल्याने संताप व्यक्त केला. यावेळी महापौरांनी महासभेच्या अंदाजपत्रकात चुकीची दुरुस्ती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.