सुहास कांदे यांच्याकडून पंकज भुजबळ यांचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:46 AM2019-10-25T00:46:30+5:302019-10-25T00:47:17+5:30
राष्टवादी कॉँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी १३,८७२ मतांनी विजय मिळविला.
नांदगाव : राष्टवादी कॉँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी १३,८७२ मतांनी विजय मिळविला. त्यांच्या विजयाच्या रूपाने तब्बल दहा वर्षांनंतर या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला.
ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा झेंडा आहे. कांदे यांना मिळालेल्या मताधिक्यात मोठा भाग नांदगाव व मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटांचा आहे. मात्र नांदगाव नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता असून, ही याठिकाणी पंकज भुजबळ यांना कांदे यांच्यापेक्षा काही हजारांचे मताधिक्य मिळाले. तसेच मनमाड नगर परिषदेतसुद्धा सेनेची सत्ता आहे; मात्र तेथे कांदेंना अपेक्षित मते मिळाली नाहीत. गुरुवारी सकाळी येथील प्रशासकीय कार्यालय आवारात मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कांदे यांनी आघाडी घेतली होती. साधारणत: बाराव्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी टिकून होती.
त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये मात्र पंकज भुजबळ यांनी आघाडी घेतली. त्यामुळे निकालाची क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत सामना अटीतटीचा होत होता. १७व्या फेरीनंतर मात्र कांदे यांनी पुन्हा मतमोजणीत आघाडी घेतली. त्यानंतर ती अखेरपर्यंत टिकवून ठेवली. अखेरच्या फेरीनंतर कांदे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली होती.
विजयाची तीन कारणे...
1गेली दहा वर्षे सातत्याने मतदारांच्या संपर्कात राहिले. ग्रामपंचायत, नगर परिषद, बाजार समिती, पंचायत समिती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर सेनेचा झेंडा लावण्यासाठी शिवसैनिकांना प्रोत्साहन दिले.
2ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या शासकीय दरबारी असलेल्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कार्यालयात विशेष व्यवस्था केली.
3रु ग्णवाहिका, पाण्याचे टॅँकर, युवकांसाठी खेळ, सांस्कृतिक कार्यक्र मात सहभाग.
भुजबळांच्या पराभवाचे कारण...
निवडून गेल्यावर पाच वर्षे नॉट रिचेबल राहिले. आमदारांना भेटायचे तर त्यांचे स्वीय सहाय्यकांनाच भेटावे लागत असे. याचा रोष सामान्यांमध्ये व स्थानिक नेते मंडळीमध्ये होता. निवडणूक तोंडावर आली तरी त्यांनी जनसंपर्कठेवला नव्हता.
पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते
१ गोविंदा बोराळे बसपा 977
२ पंकज भुजबळ राष्ट्रवादी 70,806
३ राजेंद्र पगारे वंचित ब. आ. 13571
४ विशाल वडघुले आम आदमी पार्टी 728
५ अशोक पाटील अपक्ष 257
६ सुदर्शन कदम अपक्ष 569
७ भगवान सोनवणे अपक्ष 721
८ पुंडलिक माळी अपक्ष 682
९ मंगल अमराळे अपक्ष 409
१० रत्नाकर पवार अपक्ष 12168
११ राहुल काकळीज अपक्ष 407
१२ शमीम सोनावाला अपक्ष 396
१३ सुनील सोनवणे अपक्ष 631
१४ संजय सानप अपक्ष 512