पेठ आगारातील संपकरी चालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 01:38 AM2021-11-20T01:38:11+5:302021-11-20T01:38:39+5:30
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या संपाने कर्मचारी आर्थिक संकटात तर प्रवासी हवालदिल असा तिढा निर्माण झालेला असतानाच संपाचा पेच सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने पेठ आगारातील चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे पेठ आगारातील कर्मचारीवर्गात खळबळ उडाली आहे.
नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या संपाने कर्मचारी आर्थिक संकटात तर प्रवासी हवालदिल असा तिढा निर्माण झालेला असतानाच संपाचा पेच सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने पेठ आगारातील चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे पेठ आगारातील कर्मचारीवर्गात खळबळ उडाली आहे.
पेठ आगारात चालक पदावर गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत असणारे गहनीनाथ अंबादास गायकवाड (वय ३३, रा. मामावली, ता. आष्टी, जि. बीड हल्ली मुक्काम सुलभानगर, पेठ) हे संप सुरू झाल्यापासून सहकारी कर्मचाऱ्यांसोबत धरणे आंदोलनात सामील होते. दरम्यान, घरी गॅस संपल्याचे समजल्याने ते घरी गेले. आर्थिक ओढाताणीने विमनस्क स्थितीत असलेल्या गायकवाड यांनी दोन खोल्यांच्या घरात पत्नी व मुले बाहेरील खोलीत असताना खोलीच्या दरवाजाची आतून कडी लावून गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी पती दरवाजा उघडत नसल्याने पत्नीला संशय आला. पत्नीने दरवाजा ठोठावूनही आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शेजाऱ्यांच्या सहकार्याने दरवाजा उघडला असता गहनीनाथ यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांना खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.