मानोरीतील जवानाची आसाममध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:29 AM2018-09-25T01:29:21+5:302018-09-25T01:30:05+5:30

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान दिगंबर माधव शेळके (४२) यांनी आसाममधील तेजपूर येथे रविवारी (दि.२३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला.

Suicide in Manori in Assam | मानोरीतील जवानाची आसाममध्ये आत्महत्या

मानोरीतील जवानाची आसाममध्ये आत्महत्या

Next

मानोरी/मुखेड : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान दिगंबर माधव शेळके (४२) यांनी आसाममधील तेजपूर येथे रविवारी (दि.२३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला. दरम्यान, या जवानाच्या मृत्यूचे गूढ उकलत नाही व त्यांना शहीद घोषित करीत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत ग्रामस्थांनी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले. अखेर प्रशासनाकडून दखल घेण्यात आल्यानंतर सायंकाळी शेळके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिगंबर शेळके हे २१ वर्षांपासून केंद्रीय राखीव पोलीस बलमध्ये सेवा बजावत होते. त्यांचा सेवेचा काळ २०१७ मध्ये संपलेला असताना २ वर्षांचा कार्यकाळ वाढवून घेतला होता. केवळ ६ महिन्यांचा सेवाकाळ शिल्लक असताना कमांडोच्या तुकडीत शस्त्रसाठा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शेळके यांनी स्वत:च्या पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त त्यांच्या पत्नीस दूरध्वनीवरून कळविण्यात आले.
आत्महत्येचे वृत्त कळताच मानोरी गावावर शोककळा पसरली. रविवारी मध्यरात्री त्यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर आणले. तेथून सोमवारी ( दि.२४ ) सकाळी येवला येथील तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात आणल्यानंतर सकाळी ९ वाजता मानोरीत दाखल करण्यात आले. या घटनेबाबत शेळके कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानंतर ग्रामस्थांच्या भावनांचाही उद्रेक झाला. यावेळी एकत्र झालेल्या ग्रामस्थांनी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेळके यांचे पार्थिव मानोरी बुद्रुक येथून पुन्हा निफाड येथे हलविण्यात आले. दुपारी १ वाजेपर्यंत मागण्या पूर्ण होत नसल्याने संतप्त ग्रामस्थ व कुटुंबीयांनी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर सुमारे तासभर रास्ता रोको करीत ‘दिगंबर शेळके अमर रहे’च्या घोषणा दिल्या. यावेळी दोन्ही बाजूंची वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाने दखल घेतली. त्यांच्या मृत्यूबाबत पत्रक आल्यानंतर शेळके कुटुंबीयांकडून पार्थिव ताब्यात घेण्यात आले. ते निफाड येथून संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मानोरीत आणण्यात आले.
सायंकाळी साडेपाच वाजता गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. साडेसहा वाजता मानवंदना देऊन जवान शेळके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. यावेळी उपस्थित हजारो ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते.
याप्रसंगी आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना नेते संभाजी पवार शिक्षक आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, माजी सभापती प्रकाश वाघ, नवनाथ काळे, बाळासाहेब गुंड, छगन आहेर, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार वारुळे, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुदा आर., येवला ग्रामीण पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, उपनिरीक्षक पाटील आदींसह तालुक्यातील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
शेळके यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी
येवला : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचे जवान दिगंबर शेळके यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दिगंबर शेळके यांनी देशाची एकवीस वर्षे सेवा केली. त्यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच त्यांना शहीद दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

Web Title: Suicide in Manori in Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.