विवाहितेची आत्महत्या, पती सासू सासऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:18 AM2021-09-16T04:18:51+5:302021-09-16T04:18:51+5:30
दिंडोरी : हुंड्यात पैसे, दागिने दिले नाही या कारणाहून लखमापूर, ता. दिंडोरी येथील विवाहितेस ...
दिंडोरी : हुंड्यात पैसे, दागिने दिले नाही या कारणाहून लखमापूर, ता. दिंडोरी येथील विवाहितेस शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांवर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखमापूर शिवार, ता. दिंडोरी येथील अर्चना प्रदीप मेसट (२५) ही विवाहिता सोमवार दि. १३ रोजी लखमापूर शिवारातील राहत्या घरातून शेतात गेली होती, मात्र ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता शेतातीलच विहिरीच्या कडेला अर्चना मेसट यांचा मोबाइल आढळला. दरम्यान विहीर पडल्याच्या संशयावरून विहिरीत रात्री उशिरापर्यंत नातेवाइकांनी शोधशोध केली असता. रात्री उशिरा विहीर अर्चना मेसट यांचा मृतदेह सापडला. दरम्यान मृत अर्चना मेसट यांचे वडील सोपान बारकू देवरे रा. पांझरवाडी, ता. येवला यांनी वणी पोलिसात फिर्याद देत मुलीच्या विवाह झाल्यापासून मुलीस पती प्रदीप सुकदेव मेसट, सासरा सुकदेव बाबुराव मेसट व सासू पद्माबाई सुकदेव मेसट हे वारंवार हुंड्याचे पैशांचे वरून, लग्नात सोन्याची चेन व अंगठी दिली नाही या कारणावरून तिचा शारीरिक, मानसिक छळ करीत तसेच मारहाण शिवीगाळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याची फिर्याद दिली आहे. याबाबात वणी पोलिसात विवाहिताच्या पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल केला असून संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान घटननंतर मुलीच्या नातेवाईक संतप्त झाल्याने लखमापूर येथे काहीसा तणाव निर्माण झाला होता. आज पाच वाजेच्या दरम्यान लखमापूर येथे तणावपूर्ण वातावरणात व पोलीस बंदोबस्तात विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.