खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयिताच्या आवळल्या मुसक्या
By admin | Published: June 19, 2017 11:06 PM2017-06-19T23:06:53+5:302017-06-19T23:06:53+5:30
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१२साली झालेल्या बहाद्दूर शेख खून प्रकरणातील संशयित चंद्रकांत अशोक जाधव हा मागील पाच वर्षांपासून फरार होता.
नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१२साली झालेल्या बहाद्दूर शेख खून प्रकरणातील संशयित चंद्रकांत अशोक जाधव हा मागील पाच वर्षांपासून फरार होता. पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा संशयित शहरातील विविध भागांमध्ये सोनसाखळ्या हिसकावून धुमाकू ळ घालत होता. अखेर गुन्हे शाखेला जाधवच्या मुसक्या आवळण्यास यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी चंद्रकांत ऊर्फ पम्म्या अशोक जाधव (३६, शांतीनगर झोपडपट्टी, अंबड) या सोनसाखळी चोरट्याच्या वास्तव्याबाबतची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील कर्मचारी स्वप्नील जुंद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी पथक तयार करून सापळा रचला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून जाधव यास शिताफीने अटक केली. त्याने कृषीनगर, गंगापूररोड, माणिकनगर, महात्मानगर, सिडको आदि परिसरात धुमाकू ळ घालत चार महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावून पळ काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची झडती घेतली असता संशयिताकडून चार विविध ठिकाणी केलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमधील एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे सुमारे पाच तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार जाधव याने शहरात सोनसाखळी ओरबाडून नेण्याचा नवा ‘उद्योग’ सुरू केला होता; मात्र पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे. यामुळे सोनसाखळी चोरीच्या घटना कमी होऊन त्याच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.