सैन्यदलात भरती न झाल्याच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 04:04 PM2020-02-13T16:04:55+5:302020-02-13T16:05:10+5:30
सिन्नर : सैन्यदलात भरती न झाल्याच्या नैराशातून सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली.
सिन्नर : सैन्यदलात भरती न झाल्याच्या नैराशातून सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. समाधान दगू म्हस्के (२४) रा. मेंढी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. समाधान गेल्या काही दिवसांपासून सैन्यदलात भरती होण्यासाठी मोठी मेहनत घेत होता. आर्मीच्या परीक्षेत त्याला अपेक्षीत यश मिळाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. आपल्या काही मित्रांसोबत तो मुंब्रा येथे सैन्यदलात भरती होण्यासाठी गेला होता. मात्र त्यात अपेक्षीत यश न आल्याने तो काही दिवसांपासून तणावाखाली होता. ज्या ठिकाणी सैन्यदलाची भरती असेल तेथे तो जाऊन प्रयत्न करीत होता. समाधान याने वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूल मधीनल बारावी सायन्सचे शिक्षण घेतले होते. सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र सैन्यदलात भरती होत नसल्याच्या नैराश्यातून त्याने आपली जीवनयात्रा संपविल्याची चर्चा होती. मयत समाधान याचे आईवडील शेती व मोलमजूरी करतात. गुरुवारी सकाळी ११ वाजता आईवडील शेतात गेल्यानंतर समाधान याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. समाधान यास मोठा भाऊ आणि एक बहिण आहे. सिन्नर नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुदाम सांगळे, गोरक्षनाथ बलक, बालाजी सोमवंशी अधिक तपास करीत आहेत.