कापशी येथील शेतकऱ्याची कर्जाच्या विवंचनेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:40 AM2018-12-08T00:40:15+5:302018-12-08T00:40:38+5:30
देवळा तालुक्यातील कापशी येथील शेतकरी गंगाराम भिला भदाणे (५५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्र वारी (दि. ७) घडली असून, सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची नागरिकात चर्चा आहे.
देवळा : तालुक्यातील कापशी येथील शेतकरी गंगाराम भिला भदाणे (५५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्र वारी (दि. ७) घडली असून, सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची नागरिकात चर्चा आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गंगाराम भदाणे हे कापशी येथे राहत असून, तेथे त्यांची वडिलोपार्जित साडेचार एकर शेती आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. त्यांनी सन २०१६ मध्ये विविध कार्यकारी सोसायटीकडून एक लाख रु पयांचे कर्ज घेतले होते. शासनाच्या कर्जमाफी योजनेतील निकषामुळे ते कर्जमाफीत बसले नाही. यामुळे ते थकबाकीदार होते. चालू वर्षी दुष्काळामुळे संपूर्ण पीक वाया गेले. त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते गेल्या आठ ते दहा दिवसांपासून होते. शुक्रवारी सकाळी गुरे चारण्यासाठी ते शेजारच्या डोंगरावरील जंगलात गेले; मात्र दुपारी जेवणासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी घरी न आल्याने घरातील व्यक्तींनी जंगलात जाऊन शोध घेतला असता ते कनसार झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. मयत गंगाराम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन विवाहित मुली असा परिवार असून, त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून, घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपास चालू आहे.