कळवण तालुक्यात दोघा शेतकऱ्यांची आत्महत्त्या
By admin | Published: April 13, 2017 07:02 PM2017-04-13T19:02:44+5:302017-04-13T19:02:44+5:30
कळवण तालुक्यात दोघा शेतकऱ्यांची आत्महत्त्या
नाशिक : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे सत्र सुरूच असून, कळवण तालुक्यात लागोपाठ दोन दिवस दोन शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याने जिल्ह्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २१च्या घरात पोहोचली आहे. या दोन्ही आत्महत्त्येप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊन अहवाल मागविला आहे.
कळवण तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्त्या केल्याची घटना दुर्मिळ मानली जात होती. तथापि, सधन असलेल्या निफाड तालुक्याप्रमाणे कळवण तालुक्यातील शेतकरीही आत्महत्त्या करू लागल्याने प्रशासनाच्या दृष्टीने ती चिंतेची बाब मानली जात आहे. भाऊसाहेब चंद्राजी बंगाळ (वय ५०, रा. आठंबे) यांनी बुधवारी घरात गळफास घेतला, तर ताराचंद रामभाऊ बागुल (वय ६५, रा. नवीबेज, ता. कळवण) यांनी गुरुवारी आपल्याच शेतात गट नंबर २३० मध्ये विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविली. या दोन्ही आत्महत्त्यांच्या घटनेने कळवण तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले असून, कर्जबाजारीपणा वा नापिकीमुळे ही घटना घडली अथवा कसे याचे चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून साधारणत: चार ते पाच शेतकरी आत्महत्त्या करीत आहेत, त्यामुळे एप्रिलमध्येही हेच प्रमाण कायम असून, आजवर २१ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत.