मानोरी येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्त्या
By admin | Published: October 29, 2016 01:04 AM2016-10-29T01:04:36+5:302016-10-29T01:05:39+5:30
मानोरी येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्त्या
लासलगाव : येथून जवळच असलेल्या मानोरी येथील कृष्णा ऊर्फ बापू भीमा संभेराव (३०) या तरुण शेतकऱ्याने घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केली.
याबाबत मानोरीचे पोलीसपाटील रतन चंदन भवर यांनी लासलगाव येथील पोलीस ठाण्यात खबर दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दीपक आवारे, हवालदार एम. एन. उंबरे व डी. के. ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. बापू संभेराव यांचे वडील भीमा बळवंत संभेराव यांच्या नावावर १ हेक्टर ५३ आर ऐवढी शेतजमीन असून, त्यातून मिळणारे उत्पन्न कमी प्रमाणात आहे. भीमा संभेराव यांच्या नावावर स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या विंचूर शाखेचे तीन लाख ७१ हजार २०० रुपयांचे कर्ज असून ते थकीत आहे. बापू यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला असून, पत्नी गरोदर आहे. घरात आई, वडील तसेच दोन विवाहित बहिणी आहेत. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एम.एन. उंबरे करीत आहेत. महसूल मंडळ निरीक्षक साबळे व तलाठी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन माहीती घेतली. निफाडच्या नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे . (वार्ताहर)