वाढदिवसाची पार्टी मागितली म्हणून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:30 PM2019-03-15T23:30:37+5:302019-03-16T00:33:01+5:30
वाढदिवस असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे पार्टी मागितल्याचा राग येऊन त्याने पार्टी मागणाऱ्या दोघांना जबर मारहाण केल्याचा प्रकार नाशिकमधील गंगापूर भागातील शिवाजीनगर परिसरात घडला.
नाशिक : वाढदिवस असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे पार्टी मागितल्याचा राग येऊन त्याने पार्टी मागणाऱ्या दोघांना जबर मारहाण केल्याचा प्रकार नाशिकमधील गंगापूर भागातील शिवाजीनगर परिसरात घडला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली आहे.
पाथर्डी फाटा येथील अतुल बापूराव निकम (२४) व साक्षीदार गणेश सुधाकर क्षीरसागर (२०) शिवाजीनगरच्या भवर टॉवरसमोर उभे असताना तेथे संशयित आरोपी शिवाजीनगर येथील सौरभ अशोक यादव (२२) व सातपूरच्या अशोकनगर येथील शुभम अनिल कुमावत (२३) आले. यातील सौरभ यादवचा वाढदिवस असल्याने अतुल व गणेश यांनी सौरभकडे वाढदिवसाची पार्टी मागितली. त्याकारणाने राग येऊन संशयित आरोपीने शुभमची कुरापत काढून अतुल व गणेश यांना शिविगाळ केली. याचदरम्यान सौरभने त्याच्या हातातील लोखंडी हत्याराने अतुलच्या छातीवर डोक्यावर वार करून त्याला दुखापत केली, तर शुभम याने गणेश याला लाकडी दांड्याने डोक्यात मारून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याची धमकी देत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे, तर याच प्रकरणत आरोपींनीही फिर्यादींवर उलट फिर्याद दाखल केली असून, वाढदिवसाची पार्टी मागणाऱ्या अतुल आणि गणेश यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यामुळे त्यांनी आपल्याला व साथीदाराला लाथाबुक्यांनी व लोखंडी सळईने मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली असून, या प्रकरणी दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक टी. पी. पाळदे अधिक तपास करीत आहे.
या प्रकरणी जिवे ठार मारण्याची धमकी व प्रयत्न तसेच शस्त्रबंधी आदेशाचे उल्लंघन करण्याच्या प्रकरणात सौरभ यादव व शुभम कुमावत यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.